DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

महात्मा गांधी यांच संपूर्ण जीवन प्रयोगातून साकारलेलं व प्रत्यक्ष कृतीवर आधारलेलं होत. -डॉ.पुरुषोत्तम पाटील

जळगाव ;- जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयात आज २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि साहित्य कला व सांस्कृतिक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ‘गांधी स्मरण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून डॉ.पुरुषोत्तम पाटील, कार्याध्यक्ष, अखिल भारतीय साहित्य परिषद, देवगिरी प्रांत हे उपस्थित होते. उपस्थित श्रोत्यांना संबोधित करतांना ते म्हणाले, “भिन्न धर्म, भिन्न प्रांत, भिन्न भाषा, भिन्न आचार-विचार व भिन्न वेश अशा अनेक दृष्टीने भिन्न असलेल्या देशातील जनतेला एकसंध करण्यासाठी गांधीजी अखेरपर्यंत कार्यरत राहिलेत. सत्य, सेवा, सत्याग्रह आदी मूल्यांना प्रत्यक्ष जीवनात उतरविणाऱ्या बापूंनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांना देखील आपल्या कृतीतून व्यापक लोकधर्मी स्वरूप दिले. राजकारण, समाजकारण, शैक्षणिक पुनर्रचना, पारस्पारिक सहजीवन, आंतरराष्ट्रीय सांमजस्यपूर्ण नवरचना इत्यादी मानवी जीवनाच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक सर्व पैलूंवर गांधीचे तत्त्वज्ञान प्रकाश टाकते. त्यात नैतिकता व मानवता देखील समाविष्ट आहे. गांधीजींचे हे तत्त्वज्ञान त्यांनी केलेल्या विविध प्रयोगातून साकारलेलं तसेच प्रत्यक्ष कृतीवर आधारलेलं आहे.’’

आपल्या भाषणात पुढे डॉ. पुरुषोत्तम पाटील यांनी सध्या अखिल विश्वाला गांधीजींच्या विचारांची किती आवश्यकता आहे यावार प्रकाश टाकला. ते म्हणाले-“ महात्मा गांधी यांचे विचार आणि कार्य आजच्या काळात देखील प्रासंगिक आहे. अनेक प्रयोगाद्वारे सिद्ध झालेले त्यांचे विचार हे मानवतेच्या कल्याणासाठी उपयोगी आहेत. अशांततेच्या आणि कोलाहलाच्या काळात त्यांनी दिलेले संदेश हे अनमोल ठरतात. तसेच सारे जग हिंसा, वर्चस्वाची जीवघेणी स्पर्धा आणि आर्थिक अस्थेर्य याने त्रस्त आहे. अशात महात्मा गांधी यांच्या अहिंसा, पारस्परिक प्रेम, बंधुभाव, सामुदायिक स्वच्छता, निसर्गोपचार, ग्रामीण विकास इत्यादी संकल्पना फारच महत्वाच्या मानल्या जावू लागल्या आहेत. या संकट काळात महात्मा गांधींच्या महात्म्याचा प्रत्यय संपूर्ण जगाला येत आहे.’’

कार्यक्रमाच्या आधी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी ‘ खरा तो एकाची धर्म’, ‘वैष्णव जन ते तेणे कहिये जे पीर पराई जाने रे’ आणि ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ सारखी गीते गायलीत. तसेच लीना बडगुजर, प्रियंका बारी आणि गुणवंत बोरसे यांनी महात्मा गांधी यांच्या जीवन आणि कार्याविषयी आपली मनोगते प्रकट केलीत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्य कला व सांस्कृतिक मंडळाचे प्रमुख प्रा.विजय लोहार यांनी केले. तसेच रा.से.यो.चे कार्यक्रम अधिकारी डॉ.विशाल देशमुख यांनी आभार मानलेत. या कार्यक्रमाला रासेयोच्या सहायक महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. जयश्री भिरूड, इतिहास विभागाचे डॉ. जुगल किशोर दुबे, माजी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.योगेश महाले आणि सुमारे ९० विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित होते.

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.