मुंबई : शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झाले आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपली भूमिका महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडली होती.
‘ज्यांना जायचं आहे त्यांनी जा…’ असं भावनिक आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शिवसेनेच्या आमदारांना केलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या आवाहनानंतर शिवसेनेचे आणखी ६ आमदार ‘नॉट रिचेबल’ झाल्याचे सांगितले जात आहे.
कृषिमंत्री दादा भुसे, शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार दीपक केसरकर, माजी मंत्री आणि आमदार संजय राठोड, सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर आणि दिलीप लांडे ‘नॉट रिचेबल’ झाल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेची गळती थांबायचे नाव घेत नाहीये. त्यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
शिवसेनेच्या आमदारांप्रमाणे खासदारही बंडखोरी करणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी ८ ते ९ खासदारही उद्धव ठाकरेंची साथ सोडू शकतात. पण पक्षांतरविरोधी कायदा त्यांना दुसऱ्या पक्षात जाण्याची परवानगी देत नाही त्यामुळे त्यांना नाईलाजाने शिवसेनेतच राहावे लागणार आहे.
शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आली आहे. काल रात्री उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावरून सगळं सामान गुंडाळून मातोश्रीला पोहोचले आहेत. दरम्यान, जे आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडू शकतात ते आमदार शक्यतो कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये भावना गवळी यांचे नाव आघाडीवर आहे असं बोलले जात आहे.
त्या वाशिमच्या खासदार आहेत. त्यांनी एकनाथ शिंदेच्या समर्थनार्थ पत्र लिहीलं होतं. बंडखोर आमदारांवर कारवाई करू नको असं त्यांनी पत्रात नमूद केलं होतं. हे पत्र त्यांनी उद्धव ठाकरेंना पाठवलं होतं. त्यांनी बंडखोर आमदारांच्या मागणीवर विचार करा असंही मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, हे खासदार सत्तापालटाची वाट पाहत आहेत. शिंदे यांच्याकडे शिवसेनेची पुर्ण कमान आल्यावर ते उद्धव ठाकरेंपासून वेगळे होतील. आणखी काही नवीन नावे समोर येऊ शकतात ज्यामध्ये एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे, ठाण्याचे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांची नावे येऊ शकतात, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.