राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा
जळगाव : प्रतिनिधी
राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून जळगाव जिल्ह्याला मंगळवारी रेड अलर्ट मिळाला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे.
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दि. २६ ते २९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत नाशिक विभागातील जळगावसह काही जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने २७ सप्टेंबर रोजी राज्यातील किनारपट्टीवरील जिल्ह्यासह काही जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला असून त्यात नाशिक विभागातील जळगाव व धुळे जिल्ह्याचा समावेश आहे.
त्यामुळे जिल्ह्यात जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे तसेच नदीकाठच्या परिसरातील गावाच्या लोकांनी सतर्क राहावे, नदी पात्रात कोणीही उतरु नये, वाहने, पशुधन इत्यादी सुरक्षित स्थळी ठेवण्यात यावे. सर्व पुरप्रवण क्षेत्रातील गावांना सावधानतेचा इशारा देण्याबाबत सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. असेही जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.