राज्यात ‘या’ ठिकाणी ‘ओमायक्रॉन’ चे 7 नवे रुग्ण
मुंबई : महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाकडून एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचा धोका आता आणखी वाढला आहे. महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.
आज शुक्रवारी ओमिक्रॉन या व्हेरियंटचे 7 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची एकूण संख्या 17 वर पोहचली आहे. त्यातच आणखी गंभीर बाब म्हणजे या नव्या 7 रुग्णांमध्ये एक जण अवघ्या साडेतीन वर्षांचा आहे.
महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे की, आज मुंबईत ओमिक्रॉन व्हेरियंटचे 3 नवीन रुग्ण आढळून आले आहेत आणि पुण्यातील पिंपरी चिंचवड महापालिकेतील 4 रुग्णांमध्ये दक्षिण आफ्रिकन प्रकार आढळून आला आहे. बाधितांमध्ये एका 3 वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. यानंतर, देशातील नवीन व्हेरियंट संक्रमितांची संख्या 32 वर गेली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे आज सापडलेल्या रुग्णांपैकी चौघांचं लसीकरण पूर्ण झालं होतं. तरीही त्यांना ओमिक्रॉन व्हेरियंट ची लागण झाल्याने नवा विषाणू लशीला दाद देत नाही का, अशीही भीती निर्माण झाली आहे.
आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना पवार म्हणाले, जिल्ह्यातील 7 पैकी 5 ओमिक्रॉन बाधितांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पवार यांनी शुक्रवारी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि इतर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
राज्यात ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णांबाबत पवार म्हणाले की, परदेशातून येणाऱ्या लोकांचा शोध घेतला जात असून त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवलं जात आहे. ते म्हणाले, “महाराष्ट्रात आतापर्यंत आम्ही एकूण 4,604 परदेशी प्रवाशांचा शोध घेतला आहे.
प्रशासन त्यांच्याशी सातत्याने संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेत आहे. पुण्यात 18 वर्षे व त्यावरील सर्व लोकांना लसीचा किमान एक डोस देण्यात आला आहे, तर मुंबई देखील अगदी जवळ आहे.