सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा! – प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

वाकोद येथे मंगल प्रवचन; श्रावक-श्राविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वाकोद – प.पू. आचार्य भगवंत १००८ श्री हिराचंद्रजी म.सा. यांच्या परंपरेतील व भावी आचार्य प.पू. महेंद्र मुनीजी म.सा. यांचे अज्ञानुवर्ती तत्त्वचिंतक प.पू. प्रमोदमुनिजी म.सा. (आदि ठाणा ३) तसेच महासतीजी प.पू. विमलेशप्रभाजी म.सा. (आदि ठाणा ११) यांचा वाकोद येथे विहार झाला. वाकोद जैन फार्म येथे ते सुखपूर्वक विराजमान झाले असून, त्यांच्या मंगल प्रवचनाचा लाभ मोठ्या संख्येने श्रावक-श्राविकांनी घेतला.
या प्रसंगी प.पू. प्रमोदमुनिजींनी आपल्या प्रवचनातून “सेवा, त्याग आणि प्रेम” ही जीवनातील यशाची त्रिसूत्री असल्याचे प्रतिपादन केले. आध्यात्मिक तसेच वैयक्तिक जीवनात यश मिळवण्यासाठी या तीन मूल्यांचा अंगीकार आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ‘शांती’ प्राप्त करण्यासाठी साधना अपरिहार्य असून, हिंदू, जैन व बौद्ध धर्मात ‘शांती’ या संकल्पनेला विशेष महत्त्व असल्याचेही त्यांनी नमूद केले.
क्रोध, मान, माया आणि लोभ हे मानवी जीवनातील चार प्रमुख दोष असून ते सर्व अनर्थांचे मूळ आहेत, असे सांगत त्यांनी उदाहरणाद्वारे याचे सोपे स्पष्टीकरण दिले. “आपल्या अंतर्मनातील दोष दूर करून गुणांना विकसित करणे हाच खरा धर्म आहे,” अशी साधी आणि प्रभावी व्याख्या त्यांनी मांडली. कमी उपभोग, अधिक त्याग आणि गुणांचे संवर्धन यावर त्यांनी विशेष भर दिला.
या कार्यक्रमास जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, माजी महापौर प्रदीप रायसोनी, अतुल जैन, सौ. ज्योती जैन, नयनतारा बाफना, अभय जैन, अविनाश जैन, सुरेश जैन, नगरसेवक अमर जैन, सचेत जैन, नंदलाल गादीया, सुनील जैन, रुपेश लुंकड, नितीन चोपडा, संदीप रेदासनी, रमण छाजेड, गणेश कर्नावट, नरेंद्र जैन यांच्यासह जळगाव येथून ४० हून अधिक श्रावक-श्राविका उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस भवरलाल कांताबाई जैन फार्म परिवारातर्फे नितीन चोपडा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचालन महावीर गोलेच्छा यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोदसिंह राजपूत, मुकेश संचेती, भीमराव दांडगे, गोविंद थोरवे आदींनी परिश्रम घेतले. वाकोद श्री श्रावक संघ, त्रिशला महिला मंडळ व नवयुवक मंडळ यांनी सहकार्य केले.
दरम्यान, संतांचा पुढील विहार ६ मे रोजी सकाळी वाकोद येथून पहूरकडे होणार असून, तेथे आगमनानंतर भाविकांनी प्रवचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !
  • जळगाव जिल्हा
  • ताज्या बातम्या
Comments (0)
Add Comment