जळगाव – तालुक्यातील वावडदा येथील एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाच दिवसीय निवासी बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, सरपंच राजेश वाडेकर, प्राचार्या जयश्री पाटील, तसेच गांधी रिसर्च फाऊंडेशनचे गिरीष कुळकर्णी, सुधीर पाटील, डॉ. अश्विन झाला उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची रूजवात करुन महात्मा गांधींच्या विचारांवर आधारित संस्कारी पिढी घडविणे, महात्मा गांधींच्या एकादश व्रतांचे पालन करण्याची प्रेरणा देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
यावेळी सरपंच राजेश वाडेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत, “आपण समाजाचे देणे लागतो. आपल्याला मिळालेली आणि आपण दिलेली मदत याची जाणीव ठेवली पाहिजे,” असे सांगून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. प्राचार्या जयश्री पाटील यांनी अशा शिबिरांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, एकात्मता आणि श्रमसंस्कारांची जाणीव निर्माण होते, असे मत व्यक्त केले. पहिल्या सत्रात गिरीष कुळकर्णी यांनी “बालकांची जबाबदारी, शिबिरातून मिळणारे शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकास” या विषयांवर मार्गदर्शन केले. याप्रसंगी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे स्वयंसेवक चंद्रकांत चौधरी, मयूर गिरासे, विक्रम अस्वार, अर्जुन प्रसाद, रौनक, अश्पाक तसेच ४५ शिबिरार्थी उपस्थित होते. प्रशांत सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. सुधीर पाटील यांनी आभार मानले.
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास प्रारंभ
- जळगाव जिल्हा