मुंबई : राज्यात पावसाने अद्याप जोर धरलेला नसल्याने उष्णतेचा त्रास वाढला असून विजेच्या वापरातही मोठी वाढ झाली आहे. वाढत्या वीज मागणीच्या पार्श्वभूमीवर महावितरणने स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम वेगाने सुरू केली आहे. मात्र, या मोहिमेला अनेक ठिकाणी नागरिकांचा विरोध होत असल्याचे चित्र आहे.
ठाणे जिल्ह्यासह अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण आणि डोंबिवली परिसरात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असून ग्राहकांना ४८ तासांत मीटर बदलण्यात येणार असल्याचे संदेश पाठविले जात आहेत. स्मार्ट मीटरमुळे वीजबिले वाढत असल्याचा आरोप काही नागरिकांकडून करण्यात येत असून, काही गृहनिर्माण संस्थांनी मीटर बॉक्सलाच कुलूप लावून विरोध दर्शविला आहे.
दरम्यान, वाढत्या चर्चेनंतर महावितरणने सामाजिक माध्यमांवर व्हिडीओ प्रसिद्ध करून स्मार्ट मीटरबाबत स्पष्टीकरण दिले आहे. जुन्या मीटरच्या जागी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट मीटर बसविले जात असून त्यातून ग्राहकांना विविध सुविधा मिळणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
महावितरणच्या माहितीनुसार, सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. तसेच हे मीटर पूर्णपणे मोफत असून पोस्टपेड स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
स्मार्ट मीटरमुळे मीटर रीडिंगची प्रक्रिया स्वयंचलित होणार असून ग्राहकांना मोबाईल अॅपद्वारे दर अर्ध्या तासाने वीज वापराची माहिती मिळणार आहे. त्यामुळे चुकीची बिले येण्याची शक्यता कमी होईल, असा दावा महावितरणने केला आहे.
स्मार्ट मीटर अधिक युनिट दाखवतात, या आरोपांबाबतही महावितरणने खुलासा केला आहे. स्मार्ट मीटर वीज वापराची तात्काळ नोंद करतात, तर जुन्या डिजिटल मीटरमध्ये काही प्रमाणात विलंबाने नोंद होत असल्याने बिल वाढल्याचा भास होऊ शकतो. मात्र, मीटर प्रत्यक्ष वापराइतकीच वीज मोजतो, असे कंपनीचे म्हणणे आहे.
डेटा सुरक्षिततेबाबतही महावितरणने स्पष्टीकरण देत स्मार्ट मीटरमधील माहिती पूर्णपणे एनक्रिप्टेड असल्याचा दावा केला आहे. तसेच ४८ तासांत मीटर बदलले नाही तर वीज पुरवठा खंडित केला जाईल, अशा अफवांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
महावितरणच्या मते, स्मार्ट मीटरमुळे अचूक बिलिंग, तक्रारींचे जलद निराकरण, वीज वापरावर नियंत्रण आणि डिजिटल सुविधांचा लाभ ग्राहकांना मिळणार आहे. वीज वितरण व्यवस्थेला अधिक आधुनिक आणि पारदर्शक बनविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे महावितरणने म्हटले आहे.