मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून ठाकरे गटातील काही खासदार वेगळा मार्ग स्वीकारण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटातील काही खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्ली आणि त्यानंतर राजस्थान दौरा केल्याने राजकीय हालचालींना अधिक वेग आला आहे.
राजस्थानमध्ये शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत असून, संभाव्य राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ठाकरे गटातील खासदारांची बैठक उद्धव ठाकरे यांनी बोलावली होती. मात्र या बैठकीला पाच खासदार अनुपस्थित राहिल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली करत असल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या आगामी वर्धापन दिनापूर्वीच काही खासदार शिंदे गटात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि, याबाबत संबंधित खासदार किंवा पक्ष नेतृत्वाकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानेही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून संभाव्य फूट रोखण्यासाठी पक्षस्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे समजते. दरम्यान, राजकीय घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा उत्सुकता वाढली असून पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत.