गर्भनलिका फुटलेल्या महिलेचा शस्त्रक्रियेतून जीव वाचला

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांची यशस्वी कामगिरी

जळगाव (प्रतिनिधी) : गर्भधारणेदरम्यान उद्भवलेल्या अत्यंत गंभीर आणि जीवघेण्या अवस्थेत २० वर्षीय महिलेचे प्राण वाचविण्यात डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांना यश आले आहे. गर्भाशयाऐवजी गर्भ फलोपियन नलिकेत वाढल्याने (एटोपिक प्रेग्नन्सी) गर्भनलिका फुटून पोटात मोठ्या प्रमाणात अंतर्गत रक्तस्त्राव झाला होता. मात्र, वेळेवर निदान करून तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आल्याने महिलेचा जीव वाचला.

ममता (वय २०) या महिलेला तीव्र पोटदुखी, चक्कर येणे आणि अशक्तपणा या तक्रारींमुळे गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत तिचा रक्तदाब अत्यंत कमी असल्याचे तसेच नाडीचे ठोके वाढल्याचे आढळले. त्यानंतर तातडीने रक्ततपासण्या आणि सोनोग्राफी करण्यात आली.

तपासणीत गर्भाशयात गर्भ नसून तो फलोपियन नलिकेत वाढत असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, गर्भनलिका फुटल्याने पोटात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. वैद्यकीय भाषेत या अवस्थेला ‘रप्चर्ड एटोपिक प्रेग्नन्सी विथ हिमोपेरिटोनियम’ असे म्हणतात. ही स्थिती अत्यंत धोकादायक असून वेळेत उपचार न झाल्यास रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो.

स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्त्रीरोग तज्ज्ञांच्या पथकाने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. लॅप्रोटोमी शस्त्रक्रियेद्वारे पोटात साचलेले रक्त बाहेर काढण्यात आले तसेच फुटलेल्या नळीत असलेला गर्भ काढून रक्तस्त्राव थांबविण्यात आला. भूलतज्ज्ञ, रक्तपेढी विभाग आणि शस्त्रक्रिया कक्षातील कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.

शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती स्थिर असून ती उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वैभव पाटील, डॉ. प्राजक्ता पाटील आणि डॉ. ऐश्वर्या चलवदे यांनी रुग्णावर यशस्वी उपचार केले.

डॉ. प्राजक्ता पाटील म्हणाल्या…

“एटोपिक प्रेग्नन्सी ही गर्भधारणेतील अत्यंत गंभीर गुंतागुंत आहे. गर्भाशयाऐवजी गर्भ नलिकेत वाढल्यास नळी फुटून अंतर्गत रक्तस्त्राव होऊ शकतो. पोटदुखी, चक्कर येणे, अशक्तपणा किंवा असामान्य रक्तस्त्राव अशी लक्षणे दिसल्यास महिलांनी तातडीने स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. अशा रुग्णांमध्ये प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते. या रुग्णाला वेळेवर उपचार मिळाल्यामुळे तिचे प्राण वाचविणे शक्य झाले.”

बातमी शेअर करा !
  • जळगाव जिल्हा
  • ताज्या बातम्या
Comments (0)
Add Comment