मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून येत्या तीन दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तविली आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या ताज्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी जोरदार सरींचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, ३ ऑगस्ट रोजी कोकण-गोवा किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याच्या भागांत जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. परिस्थिती लक्षात घेऊन काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
यलो अलर्टमध्ये रायगड, रत्नागिरी, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर तसेच विदर्भातील अकोला, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय बुलढाणा, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाच्या सरी कायम राहण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. विदर्भात मात्र मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, सततच्या पावसामुळे सखल भागांत पाणी साचणे, घाट रस्त्यांवर घसरडी परिस्थिती निर्माण होणे तसेच वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदी-नाले आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे तसेच हवामान विभाग व स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.