जळगाव : जळगाव तालुक्यातील जळगाव येथील स्वप्नपूर्ती लोकसंचलित साधन केंद्राला महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या नाशिक विभागातून प्रथम उत्कृष्ट लोकसंचलित साधन केंद्र म्हणून गौरविण्यात आले. मुंबई येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे आयोजित माविमच्या सन २०२५-२६ राज्यस्तरीय वार्षिक आढावा बैठकीत हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला.
या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यात आले. त्यामध्ये माविम जळगाव जिल्ह्याने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला. जळगाव जिल्ह्यांतर्गत कार्यरत स्वप्नपूर्ती लोकसंचलित साधन केंद्राने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत नाशिक विभागातून संस्थेला सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
माविमच्या व्यवस्थापकीय संचालक राजलक्ष्मी शाह (भा.प्र.से.) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा भारती झांबरे, व्यवस्थापक जयश्री खोडपे, लेखापाल भूषण न्हावकर, जिल्हा समन्वय अधिकारी सुमेध तायडे, युवराज पाटील, परेश गडे, आरसी शैलेश पाटील तसेच आरबीडीसी नवनाथ नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशामागे संस्थेच्या सर्व सीएमआरसी (CMRC) कर्मचाऱ्यांचे तसेच बचत गटातील महिलांचे मोलाचे सहकार्य असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.