हरित चाळीसगावासाठी चाळीसगाव नगरपरिषदेचा संकल्प

नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या पुढाकाराने शहरात ६ हजार वृक्षारोपण अभियान सुरू

चाळीसगाव : चाळीसगाव शहराला अधिक हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या उद्देशाने चाळीसगाव नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या पुढाकारातून चाळीसगाव शहरात ६ हजारांहून अधिक झाडांचे वृक्षारोपण करण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प करण्यात आला आहे. या अभियानाचा शुभारंभ आज नगरपरिषद शाळा क्रमांक २, केकी मूस बंगल्याच्या बाजूला येथे नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला.

यावेळी उपनगराध्यक्ष हर्षल चौधरी, नगरसेवक राहुल म्हस्के, धर्मराज बच्छे, नगरपरिषदेचे अभियंता देवेंद्र शिंदे, आरोग्य निरीक्षक विजय जाधव यांच्यासह परिसरातील नागरिक, नगरपालिका कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण म्हणाल्या की, “आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या संकल्पनेतील द बेस्ट चाळीसगाव घडवण्यासाठी केवळ रस्ते, गटारी आणि पायाभूत सुविधा पुरेशा नाहीत, तर स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आज आपण जी रोपे लावत आहोत, ती उद्याच्या पिढीसाठी प्राणवायू, सावली आणि पर्यावरण संतुलन जपणारे वृक्ष बनतील.” पर्यावरण संवर्धनासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दिलेला “एक पेड माँ के नाम” हा संदेश प्रेरणादायी असून त्याच आदर्शातून चाळीसगाव नगरपरिषद हे वृक्षारोपण अभियान राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.

वृक्ष लागवड ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून लोकसहभागाशिवाय हे अभियान यशस्वी होऊ शकत नाही, असे नमूद करत त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, “आपल्या परिसरात जिथे जिथे वृक्षारोपण होईल, त्या प्रत्येक रोपाची काळजी घेणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे.”

नगरपरिषदेच्या वतीने शहरातील शाळा परिसर, सार्वजनिक मोकळी मैदाने, रस्त्यांच्या कडेला, शासकीय जागा तसेच विविध प्रभागांमध्ये टप्प्याटप्प्याने वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या अभियानामुळे शहरातील हरित क्षेत्र वाढण्यास, तापमान नियंत्रणास, वायुप्रदूषण कमी होण्यास आणि जैवविविधतेच्या संवर्धनास मोठी मदत होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

शहर विकासाच्या संकल्पनेला पर्यावरणपूरक दिशा देत चाळीसगाव नगरपरिषदेने सुरू केलेल्या या उपक्रमाचे नागरिक, सामाजिक संस्था आणि विविध स्तरांमधून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. हरित चाळीसगावच्या दिशेने उचललेले हे पाऊल भविष्यात शहराच्या पर्यावरणीय समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

बातमी शेअर करा !
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
Comments (0)
Add Comment