जळगाव : शहरातील शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका इसमास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. प्रकाश तोलार, रा. खेडी, ता. जळगाव, ह.मु. साई सिटी, जळगाव असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
जळगाव जिल्ह्यात अवैधरित्या घातक शस्त्रे व अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींविरोधात प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार शनीपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
दरम्यान, १० ऑगस्ट २०२६ रोजी शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्मशानभूमीजवळील उमेश बियर शॉपीजवळ एक इसम अवैध अग्निशस्त्र बाळगून असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची पडताळणी करून पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत प्रकाश तोलार यास ताब्यात घेतले.
त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी सदर अग्निशस्त्र व काडतुसे जप्त केली असून, याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७२/२०२६, आर्म्स अॅक्ट व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावीत तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडेकर, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक अभिषेक कटारे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय खैरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश जाधव, पोलीस नाईक महेंद्र पाटील, पराग दुसाने, पोलीस कॉन्स्टेबल अमोल वंजारी, निलेश घुगे, गणेश ढाकणे व योगेश साबळे यांच्या पथकाने सहभाग घेतला.