जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप ११ सप्टेंबरपासून

विविध वयोगटांसह खुल्या व ३५ वर्षांवरील वरिष्ठ गटांचा समावेश; जिल्ह्यातील खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन

जळगाव : जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, जळगाव यांच्या प्रायोजकत्वातून स्व. अविनाश दामले सर यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ११ ते १३ सप्टेंबर २०२६ दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघ येथील बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहे.
या स्पर्धेत ९, ११, १३, १५, १७ आणि १९ वर्षांखालील विविध वयोगटांसह खुला गट आणि ३५ वर्षांवरील वरिष्ठ गट सहभागी होणार आहेत. मुला-मुलींसाठी तसेच पुरुष व महिलांसाठी एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी प्रकारातील सामने खेळविण्यात येणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक खेळाडूला नोंदणी करणे अनिवार्य आहे. प्रवेश अर्ज गुगल फॉर्मद्वारे स्वीकारण्यात येणार असून, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. स्पर्धेतील प्रवेश केवळ जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंसाठी मर्यादित ठेवण्यात आला आहे.
स्पर्धेतील सामने भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या नियमानुसार खेळविण्यात येणार असून, सामन्यांना सकाळी ७ वाजता सुरुवात होणार आहे.
या स्पर्धेतून निवड होणाऱ्या खेळाडूंना आगामी महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंनी स्पर्धेत सहभागी होऊन आपले कौशल्य सिद्ध करावे, असे आवाहन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन आणि सचिव विनीत जोशी यांनी केले आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी किशोर सिंह : ९९७०४ १४९५४ / ९४२११ २११०६ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे

बातमी शेअर करा !
  • जळगाव जिल्हा
  • ताज्या बातम्या
Comments (0)
Add Comment