जळगावात चोरीचा गुन्हा पाच तासांत उघडकीस

गुन्हे शोध पथकाची तत्पर कारवाई; तिघे ताब्यात, १२ हजारांची रोकड हस्तगत

जळगाव  : शाहूनगर परिसरातील शाहू कॉम्प्लेक्स येथे एका व्यक्तीच्या पॅन्टच्या खिशातून १२ हजार ५०० रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याच्या घटनेचा जळगाव शहर पोलिसांनी अवघ्या पाच तासांत छडा लावला. गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत दोन प्रौढ आरोपींसह एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून १२ हजार रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे.

दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ ते ४.३० वाजेदरम्यान शाहूनगर येथील शाहू कॉम्प्लेक्स परिसरात ही चोरी झाली. महेश प्रगती मंडळाचे मॅनेजर व दूध विक्रेते अनिल राजमल कासट (वय ६२, रा. एमआयडीसी, म्हाडा कॉलनी, जळगाव) यांच्या पॅन्टच्या खिशातील १२ हजार ५०० रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. याप्रकरणी कासट यांच्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गुन्हा क्र. ३३५/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांना आरोपींचा तातडीने शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक शिंपी यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार केले.

तपासादरम्यान पथकाने गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारे चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांचा शोध सुरू केला. या तपासात शहीदखान नजीरखान (वय २७, रा. युसूफ मेडिकलजवळ, गेंदालाल मिल, जळगाव), समीर खान मजीदखान (वय ३७, रा. गेंदालाल मिल, जळगाव) आणि एका विधी संघर्षित बालकाचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार संशयित गेंदालाल मिल परिसरातील एका दुकानाजवळ असल्याचे समजताच गुन्हे शोध पथकाने तत्काळ तेथे धाव घेत तिघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

त्यानुसार दोन्ही प्रौढ आरोपींना अटक करण्यात आली असून, विधी संघर्षित बालकास कायदेशीर प्रक्रियेनुसार ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून १२ हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. या कारवाईमुळे चोरीचा गुन्हा अवघ्या पाच तासांत उघडकीस आणण्यात जळगाव शहर पोलिसांना यश आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

बातमी शेअर करा !
  • जळगाव जिल्हा
  • ताज्या बातम्या
Comments (0)
Add Comment