व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली महापौरांची भेट
जळगाव : महात्मा ज्योतिबा फुले मार्केटमधील दुकानांबाहेरील ओट्यांचे अतिक्रमण निष्कासित करण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावित कारवाईच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी (९ सप्टेंबर) महापौर दीपमाला काळे यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. या वेळी महापौरांनी अतिक्रमण विभागाला सर्व दुकानांचे अधिकृत मोजमाप करून नियमाबाहेरील अतिक्रमणच हटवण्याचे निर्देश दिले, तसेच रस्त्यावरील हॉकर्सवरही समान कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले.
भेट प्रसंगी भाजपचे गटनेते प्रकाश बालाणी, स्वीकृत नगरसेवक रमेश मतानी, मनपा उपायुक्त पंकज गोसावी, अतिक्रमण विभाग प्रमुख संजय ठाकूर, गौरव सपकाळे यांच्यासह महात्मा फुले मार्केटचे व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चर्चेदरम्यान व्यापाऱ्यांनी महापौरांसमोर आपली भूमिका मांडताना सांगितले की, महापालिका प्रशासन अतिक्रमण काढताना व्यापाऱ्यांना एक नियम लावते आणि रस्त्यावर बसणाऱ्या हॉकर्सला वेगळा नियम लावते. महापालिका प्रशासनाकडून चाललेल्या या दुजाभावाबद्दल व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर महापौर दीपमाला काळे यांनी तत्काळ महापालिका आयुक्त आदित्य जीवने यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सविस्तर चर्चा केली. त्यानंतर अतिक्रमण विभागाचा प्रभार असलेले उपायुक्त पंकज गोसावी यांना महापौर दीपमाला काळे यांनी निर्देश दिले.
फुले मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या जागांचे रीतसर मोजमाप करण्यात यावे. अधिकृत मोजमापाच्या बाहेर जे भाग असतील, तेच अतिक्रमण मानून हटवण्यात यावेत. दुकानदारांनी कपड्यांचे पुतळे किंवा इतर उत्पादनांचे नमुने दुकानाबाहेर टांगू नयेत, सर्व साहित्य दुकानाच्या आतच ठेवावे. रस्त्यावर किंवा आडोशाने अतिक्रमण करणाऱ्या हॉकर्सवरही कोणतीही सवलत न देता कारवाई करण्यात यावी, अशा सूचना महापौर दीपमाला काळे यांनी दिल्या.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचा परिसर पूर्णपणे स्वच्छ आणि अतिक्रमणमुक्त राहावा याची काळजी घ्यावी. महात्मा फुले मार्केट येथील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली असून त्यांची तातडीने दुरुस्ती व नूतनीकरण करण्याबाबतही महापौरांनी आयुक्तांशी चर्चा केली. व्यापाऱ्यांच्या सर्व समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी लवकरच महात्मा ज्योतिबा फुले मार्केटला वैयक्तिक भेट देऊन पाहणी करणार असल्याचे आश्वासन महापौर दीपमाला काळे यांनी व्यापाऱ्यांना दिले.