अमळनेरात बिबट्याचा धुमाकूळ; तरुणावर हल्ला

अमळनेर | प्रतिनिधी

बोरी नदीकाठावरील सानेनगर परिसरात गुरुवारी (१७ सप्टेंबर) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास बिबट्याने एका तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली. तरुणाने प्रसंगावधान राखत जोरजोरात आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. या हल्ल्यात तरुण किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

योगेश मनोज पाटील हा तरुण गुरे चारण्यासाठी बोरी नदीकाठाजवळ गेला होता. झुडपांच्या परिसरात तो बसलेला असताना अचानक मागून आलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. बिबट्याने योगेशच्या शर्टला पकडून त्याला मागे ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी योगेशने स्वतःची सुटका करण्यासाठी पुढे ओढ घेत प्रतिकार केला. झटापटीदरम्यान त्याने आरडाओरड केल्याने बिबट्या तेथून पळून गेला.

घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक मुख्तार खाटीक यांच्यासह काही नागरिकांनी हातात काठ्या घेऊन बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. वनाधिकारी छत्रपती चव्हाण यांच्या परवानगीने बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात ट्रॅप कॅमेरे तसेच पिंजरा लावण्यात आला आहे. वनपाल गुलाब पिंजारी यांनी याबाबतची माहिती दिली.

या घटनेमुळे सानेनगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

बातमी शेअर करा !
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
Comments (0)
Add Comment