तुरखेड्यात ‘वाचन कट्टा’चा शुभारंभ

माय माती फाउंडेशनचा उपक्रम; मुलांच्या वाचन संस्कृतीला मिळणार नवी दिशा

तुरखेडा, ता. जि. जळगाव : माय माती फाउंडेशनच्या वतीने तुरखेडा येथे ‘वाचन कट्टा’ सुरू करण्यात आला असून, त्याचा उद्घाटन समारंभ रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना उपस्थितांनी सांगितले की, वाचन कट्टा ही केवळ पुस्तके वाचण्याची जागा नसून मुलांना विचार करण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी आणि स्वप्ने पाहण्यासाठी मिळालेली हक्काची जागा आहे. आजच्या डिजिटल युगात मुलांना मोबाईलपासून दूर करून पुस्तकांच्या जगाशी जोडण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
माय माती फाउंडेशनच्या संस्थापिका सौ. प्रभावती पाटील यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. पालकांनी आपल्या मुलांना दररोज किमान अर्धा तास वाचनासाठी वाचन कट्ट्यावर पाठवावे, तसेच ग्रामस्थांनी आपल्या घरातील जुनी अथवा नवीन पुस्तके वाचन कट्ट्यासाठी भेट द्यावीत, असे आवाहन करण्यात आले.
वाचनामुळे मुलांची विचार करण्याची क्षमता, भाषिक कौशल्य, आकलनशक्ती आणि संवादकौशल्य विकसित होण्यास मदत होते. त्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी वाचनाची सवय महत्त्वाची असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमास सरपंच नितीन पंढरीनाथ सपकाळे, ग्रामविकास अधिकारी पल्लवी अशोक मोरे, नितीन बापट, उपसरपंच निवृत्ती श्रावण पाटील, इंजि. साहेबराव पाटील, विद्या अनिल पाटील, सुकलाल निंबा कोळी, उल्हास जैन (गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर) , गलू मुरलीधर सपकाळे (रोजगार सेवक), वारेंद्र निळकंठ पाटील, जितेंद्र मधुकर पाटील (वि. का. चेअरमन), मधुकर महाजन, भाग्यश्री समाधान कोळी (पोलीस पाटील), सचिन बाविस्कर (कृषी सहाय्यक) आदी उपस्थित होते.
‘वाचन कट्टा’ हा तुरखेडा गावातील प्रत्येक मुलाच्या प्रगतीचे केंद्र बनो, अशी सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन माय माती फाउंडेशन आणि टीम माय माती फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले.

बातमी शेअर करा !
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
Comments (0)
Add Comment