ज्येष्ठ कवी भगवान भटकर यांच्या ‘कवितेच्या वळणवाटा’ आणि ‘तुकबंदी’ या काव्यसंग्रहांचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

जळगाव : आकाशवाणीचे माजी केंद्र निदेशक, ज्येष्ठ कवी व साहित्यिक भगवान भटकर यांच्या ‘कवितेच्या वळणवाटा’ (मराठी काव्यसंग्रह) आणि ‘तुकबंदी’ (हिंदी-उर्दू काव्यसंग्रह) या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, जळगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या सोहळ्यात ‘कवितेच्या वळणवाटा’ या मराठी काव्यसंग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध साहित्यिक व कवी वा. ना. आंधळे यांच्या हस्ते, तर ‘तुकबंदी’ या हिंदी-उर्दू काव्यसंग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध कवी व समीक्षक, कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी उपकुलसचिव डॉ. रफिक काझी ‘राही’ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मु.जे. महाविद्यालयातील प्रा. देवेंद्र इंगळे तर अतिथी म्हणून अथर्व पब्लिकेशनचे संचालक युवराज माळी उपस्थित होते.

कवीच्या साहित्यप्रवासाचा गौरव

प्रास्ताविकात डॉ. सुधीर भटकर यांनी भगवान भटकर यांच्या साहित्यप्रवासाचा आढावा घेतला. आकाशवाणीवरील प्रदीर्घ सेवाकाळात प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळतानाही त्यांच्यातील कवी सतत जागृत राहिला. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांचा ‘मागे राहिलेल्या कविता’ हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशितकेला होता.तर वयाच्या ९० व्या वर्षी दोन नवे काव्यसंग्रह रसिकांच्या भेटीला आणले आहेत. त्यांच्या साहित्यनिर्मितीला मूर्त स्वरूप देण्याची जबाबदारी अर्थव प्रकाशनाचे युवराज माळी यांनी समर्थपणे पार पाडली. तसेच वा. ना. आंधळे आणि प्रा. रफिक काझी यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहून काव्यसंग्रहांची उंची वाढविली, याबद्दल त्यांनी सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

कविता म्हणजे मानवतेचा संदेश : डॉ. रफिक काझी

मनोगत व्यक्त करताना डॉ.रफिक काझी ‘राही’ म्हणाले की, साहित्यलेखन माणसाला चिरतरुण ठेवते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे भगवान भटकर. त्यांच्या दीर्घायुष्याचे आणि उत्साही जीवनाचे रहस्य त्यांच्या साहित्यप्रेमात दडलेले आहे. त्यांच्या कवितेत मानवताधर्माचा संदेश, संवेदनशीलता आणि मानवी भावभावनांची सखोल जाणीव प्रकर्षाने दिसून येते.

दलित आणि ललित साहित्याचा सुंदर संगम : वा. ना. आंधळे

सुप्रसिद्ध कवी वा. ना. आंधळे यांनी आपल्या मनोगतात भगवान भटकर यांच्या कवितेचे वैशिष्ट्य अधोरेखित केले. त्यांच्या कवितेत दलित आणि ललित साहित्याचा सुंदर संगम आढळतो. उद्विग्नता, सामाजिक जाणीव, जागृती, चिकित्सा, दुःख, आनंद, प्रेम, जीवनमूल्ये आणि सामाजिक अभिसरण अशा विविध साहित्यिक मूल्यांचा आविष्कार त्यांच्या कवितेत होतो.

चारोळी, अभंग, हायकू, लावणी, ओवी आदी विविध काव्यप्रकारांचा सुंदर मिलाफ त्यांनी प्रसंगानुरूप साधला आहे. त्यांच्या कवितेत वेदना, विद्रोह आणि परिवर्तनाची हाक प्रभावीपणे उमटते. समाजातील समस्यांवर भाष्य करण्याबरोबरच अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची ताकद त्यांच्या लेखणीत आहे. त्यांच्या कवितेवर समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पीएच.डी. स्तरावर संशोधन होऊ शकते, यूअसेही त्यांनी नमूद केले. या काव्यसंग्रहाची प्रस्तावना लिहिण्याची संधी मिळणे हे आपले भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले.

कवितेत विद्रोह, विज्ञान आणि वैश्विक मानवता : प्रा. देवेंद्र इंगळे

अध्यक्षीय भाषणात प्रा. देवेंद्र इंगळे यांनी भगवान भटकर यांचा गौरव करताना त्यांनी ‘महाराष्ट्राचे अमीन सयानी’ अशी ओळख असल्याचे नमूद केले. त्यांच्या कवितेत विद्रोह, विज्ञाननिष्ठ विचार आणि वैश्विक मानवतेचा सुंदर आविष्कार आहे. कवीचे मन झिरपणे आणि पाझरणे म्हणजे काय, याचा प्रत्यय त्यांच्या कवितेतून येतो. शालीनता, मृदुता आणि संवेदनशीलतेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे त्यांची कविता होय. त्यांच्या कवितांना संगीतबद्ध करून उत्तम गीतांची निर्मिती होऊ शकते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. भगवान भटकर यांच्या वयाच्या नव्वदाव्या वर्षी प्रकाशित झालेल्या या दोन काव्यसंग्रहांमुळे मराठी तसेच हिंदी-उर्दू साहित्यविश्वात मोलाची भर पडली असून, त्यांच्या साहित्यप्रवासाचा हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.

मनातील विचार आणि भावविश्व व्यक्त करता आले- भगवान भटकर

भगवान भटकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आकाशवाणीची सेवा बजावताना कविता लेखनाचा छंद त्यांनी जोपासला.मात्र प्रशासकीय कामांच्या व्यापामुळे मनातील भावभावना व्यक्त करण्याचे राहून गेले. आता पूर्वीचा एक आणि या दोन काव्यसंग्रहांच्या माध्यमातून त्यांना मनातील विचार आणि भावविश्व व्यक्त करता येत आहे.

वा. ना. आंधळे आणि डॉ. रफिक काझी यांनी लिहिलेल्या अभ्यासपूर्ण समीक्षात्मक प्रस्तावनांमुळे या काव्यसंग्रहांची साहित्यिक उंची वाढली असून, ही बाब आयुष्यभर आनंद देत राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रा. देवेंद्र इंगळे यांचे स्वागत उपकुलसचिव डॉ. मुनाफ शेख, कवी प्रा.वा. ना. आंधळे यांचे स्वागत वैद्य पी.एस. चौधरी, डॉ. रफिक काझी यांचे स्वागत होमिओपॅथी  कन्सल्टंट डॉ. विलास महाजन, युवराज माळी यांचे स्वागत डॉ. सुभाष तळेले, कवी भगवान भटकर यांचे स्वागत प्रा. चारुदत्त गोखले,सौ. यशोदा भटकर यांचे स्वागत सौ. प्रज्ञा इंगळे यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पारधे यांनी केले. तर आभार प्रदर्शन गौरव हरताळे यांनी मानले. या प्रसंगी डॉ. सोमनाथ  वडनेरे, कवी संतोष साळवे, डी.डी. पाटील (जामनेर) बाळकृष्ण तायडे (बुलढाणा) कवी शीतल पाटील, पुष्पा कोळी, वंदना ठुमके,एन.के. कोळी, निंबा पुना बडगुजर, गोविंद पाटील, शिवलाल बारी, सेवानिवृत्त प्रांताधिकारी प्रीतम तायडे, महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी सुभाष मराठे,गोविंद सावदेकर,  राहूल  झांबरे, किशोर भारंबे,गोपाल चव्हाण ,अतुल पाटील, यशवंत गरुड, अनिल मस्के, प्रल्हाद लोहार, मंगेश बाविसाने यांच्यासह जळगाव शहरातील तसेच जिल्ह्यातील मान्यवर नागरिक, साहित्यिक, कवी आणि शिक्षणक्षेत्रातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बातमी शेअर करा !
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
Comments (0)
Add Comment