24 तास ऑनलाईन असणारा आरोपी पोलिसांना गवसेना!

व्यावसायिकाची साडेतीन कोटीत फसवणूक : सुरेश तलरेजा मुख्यमंत्र्यांना भेटणार

जळगाव : शहरातील एका मोक्याच्या व्यापारी संकुलात महापालिकेची बनावट बांधकाम परवानगी दाखवून तब्बल 3 कोटी 72 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोन महिन्यांपूर्वी शहर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. दरम्यान, गुन्ह्यातील संशयित जळगावसह देशभरात मोकाट फिरत आहे. दिवसभर सोशल मीडियात व्हिडिओ पोस्ट करून पोलिसांना खुले आव्हान देत असताना देखील ते पोलिसांना गवसत नसल्याने काहीतरी काळेगोरे असल्याचे आम्हाला वाटते, असे सुरेश तलरेजा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जिल्ह्यातील व्यावसायिक सुरेश नंदलाल तलरेजा (क्य 63, रा.श्रावेल अपार्टमेंट, गणपतीनगर) हे हॉटेल व इस्टेट ब्रोकरचा व्यवसाय करतात. काही संशयितांनी शहरातील सिटी सर्व्हे क्र. 2125/7 वरील संत बाबा हरदासराम शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकाने व ऑफिस विक्रीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. जाहिरात पाहून श्री. तलरेजा यांनी तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयाबाबत चौकशी केली. सुरुवातीला मनपाची परवानगी नसल्याने तलरेजा यांनी व्यवहार नाकारला होता. मात्र, संशयित आरोपींनी मनपाच्या नगररचना अधिकाऱ्यांची सही व शिक्का असलेले तिसऱ्या मजल्याच्या वैध बांधकाम परवानगीचे बनावट पत्र दाखवले विश्वास संपादन केला. यानंतर तलरेजा यांनी विविध व्यवहारांतून आरोपींना 3 कोटी 72 लाख रुपये दिले. जागेचा ताबा मिळाल्यानंतर त्यांनी सुमारे 35 लाख रुपये खर्च करून कार्यालय व रीडिंग रूम सुरू केली. मात्र, मनपाकडे चौकशी केली असता तिसऱ्या मजल्याला परवानगीच नसल्याचे उघड झाले. धक्कादायक म्हणजे, तलरेजा यांच्या ताब्यातील जागा कागदपत्रांमध्ये ओपन टेरेस दाखवून मुंबईतील कंपनीच्या नावावर परस्पर विकण्यात आली.
याप्रकरणी सुरेश तलरेजा यांच्या फिर्यादीवरून के. पी. इन्फ्रास्ट्रक्चर व प्रोप्रायटर ममता अनिल साहित्या, अनिल खुबचंद साहित्या, खुबचंद प्रेमचंद साहित्या, नितीन खुबचंद साहित्या (सर्व रा. खुबचंद साहित्या टॉवर, मोहाडी रोड, जळगाव), जयराम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्‌‍स प्रा. लि. (ग्रँट रोड, मुंबई), विशाल रामगोपाल शर्मा (संचालक, जयराम इन्फ्रास्ट्रक्चर, मुंबई) यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनतर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. खुबचंद साहित्या याला अटक करावी यासाठी मी आजवर वेळोवेळी पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. त्याला अटक केली जात नसल्याने पोलिसांवर कुणाचा तरी दबाव असावा किंवा तपास यंत्रणेचे साहित्यासोबत काहीतरी साटेलोटे असावा असा आम्हाला संशय असल्याचे सुरेश तलरेजा यांनी सांगितले. करोडो रुपयांची फसवणूक होऊन देखील आम्हाला न्याय मिळत नसल्याने मी हतबल झालो आहे. न्याय देवतेवर आम्हाला विश्वास आहे मात्र पोलिसांच्या संथ तपास आणि कार्यशैलीवर विश्वास राहिलेला नाही. पुढील आठवड्यात दिवाळी असून तत्पूर्वीच मी न्यायासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कैफियत मांडणार असल्याचे सुरेश तलरेजा यांनी सांगितले आहे.

सोशल मीडियात व्हिडिओ, पोलीस, नेत्यांवर टीका
शहर पोलीस ठाण्यात दि.6 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल करून दोन महिने पूर्ण झाले आहेत. संशयीत खुबचंद साहित्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दररोज ऑनलाईन राहून व्हिडिओ तयार करतो. मुंबई, दिल्ली, पंजाब, मध्यप्रदेशसह देशभरातील विविध शहरांमध्ये जाऊन तो व्हिडिओ तयार करतो. जळगावात दि.28 ऑक्टोबर रोजी येणार असल्याचा व्हिडिओ देखील त्याने शेअर केला होता. इतकेच काय तर जिल्ह्यातील नेते आणि पोलिसांवर देखील तो टीका करतो. हे सर्व प्रकार पोलिसांना माहिती असल्याचे देखील सुरेश तलरेजा यांनी सांगितले.

बातमी शेअर करा !
  • जळगाव जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
Comments (0)
Add Comment