अनधिकृत गोठे, अतिक्रमण, अस्वच्छतेवर दंडात्मक कारवाई

महापौर दीपमाला काळे यांचा वॉर्ड क्रमांक १७ येथे दौरा

जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या ‘महापौर स्वच्छता संकल्प अभियान’ अंतर्गत मंगळवारी (दि. ३ नोव्हेंबर) महापौर दीपमाला काळे यांनी वॉर्ड क्रमांक १७ मधील विविध भागांना भेट देऊन पाहणी केली.

या वेळी स्थानिक नगरसेवक इब्राहिम पटेल, अक्षय वंजारी, जरीना शब्बीर शाह, हीनाबी शाकीरखान, माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यासह आरोग्य विभागाचे प्रमुख समीर बोरोले, अभियंता विजय मराठे तसेच पाणीपुरवठा, विद्युत व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मेहरूण परिसरातील पाहणी व सूचना
मेहरूण परिसरातील साईबाबा मंदिराजवळ पाहणी करताना, तेथील जुन्या मुत्रालयामुळे नागरिकांना त्रास होत असल्याने ते तातडीने काढून टाकण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. तसेच त्या मोकळ्या जागेवर नागरिकांना बसण्यासाठी बाकडे टाकण्यास सांगितले व परिसरातील गटारी स्वच्छ करण्याचे निर्देश दिले.

अनधिकृत गोठे आणि अस्वच्छतेवर कारवाई
एमआयडीसी रस्त्यावरील जुन्या बुरुजसमोर महानगरपालिकेच्या जागेवर गाई-म्हशींचे गोठे उभारल्याचे आणि अनधिकृत व्यवसाय सुरू असल्याचे महापौरांच्या निदर्शनास आले. यावर त्यांनी संबंधित व्यक्तींना चांगलेच धारेवर धरले. तसेच तिथे पसरवलेल्या अस्वच्छतेबद्दल त्यांना जागीच दंड ठोठावण्यात आला आणि ती ओपन स्पेस तात्काळ मोकळी करून घेण्याचे आदेश दिले.

लक्ष्मी नगर व नाला साफसफाईचे आदेश
लक्ष्मी नगरमधील गटारी नाला साफ करून तिथे कल्वर्ट टाकून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. या भागातून जाणाऱ्या मोठ्या नाल्याबाबत नागरिकांच्या यापूर्वीच तक्रारी असूनही कारवाई न झाल्याने, महापौरांनी संताप व्यक्त करत तात्काळ नाला साफ करून कल्वर्ट टाकण्याचे आदेश दिले.

दत्तनगरमधील कामे
दत्तनगर परिसरामध्ये प्रलंबित असलेली गटारींची कामे पूर्ण करून ओव्हरफ्लो होणाऱ्या सर्व गटारी तातडीने साफ करून घेण्याबाबतही त्यांनी संबंधित विभागाला निर्देश दिले. या अभियानामुळे नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सुटतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा !
  • Uncategorized
Comments (0)
Add Comment