‘एसएसबीटी प्रतिभा हाफ मॅरेथॉन’च्या नावनोंदणीला सुरुवात

रावसाहेब शेखावत यांच्या हस्ते शुभारंभ; यंदाची स्पर्धा ‘जळगाव रन्स फॉर फार्मर्स’ संकल्पनेतून शेतकऱ्यांना समर्पित

जळगाव : श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट संस्थेतर्फे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार, २० डिसेंबर रोजी जळगाव शहरात ‘एसएसबीटी प्रतिभा हाफ मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या नावनोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक रावसाहेब शेखावत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी स्वतः ५ किलोमीटर गटासाठी नावनोंदणी करून स्पर्धेत सहभाग नोंदविला.

यंदा राज्यावर दुष्काळाचे सावट असल्याने ही मॅरेथॉन शेतकऱ्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी त्यांना समर्पित करण्यात येणार आहे. ‘जळगाव रन्स फॉर फार्मर्स’ अशी या स्पर्धेची संकल्पना असून, स्पर्धेतून मिळणारा निधी मुख्यमंत्री दुष्काळ निवारण सहायता निधीस मदत म्हणून देण्यात येणार असल्याची माहिती रावसाहेब शेखावत यांनी दिली. संस्थेचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच महाराष्ट्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.स्पर्धेचे समन्वयक डॉ. एम. व्ही. रावलानी व डॉ. प्रदीप एम. सोलंकी, तसेच रेस डायरेक्टर प्रा. प्रवीण पाटील आणि डॉ. दिनेश पुरी यावेळी उपस्थित होते.

ही स्पर्धा जळगाव शहरातील खानदेश सेंट्रल मॉलच्या मैदानावरून सुरू होणार असून, स्पर्धेचा मार्ग शहरातून असणार आहे. २१ किलोमीटर, १० किलोमीटर, ५ किलोमीटर आणि ३ किलोमीटर अशा चार गटांत स्पर्धा होईल. २१ आणि १० किलोमीटरच्या गटासाठी आरएफआयडी प्रणालीचा वापर करण्यात येणार असून, या दोन्ही स्पर्धा वेळेवर आधारित असतील.

अशी असेल नावनोंदणी शुल्क

३ किलोमीटरसाठी ३५० रुपये, ५ किलोमीटरसाठी ५०० रुपये, १० किलोमीटरसाठी ७०० रुपये आणि २१ किलोमीटरसाठी ९०० रुपये प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे. एसएसबीटी संस्थेच्या विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे.

प्रत्येक सहभागी धावपटूला आयोजकांतर्फे टी-शर्ट, स्पर्धा पूर्ण केल्यानंतर पदक, प्रमाणपत्र आणि नाश्ता देण्यात येणार आहे. धावण्याच्या मार्गावर ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, बिस्किटे, चॉकलेट, निमगोळी, एनर्जल, लिंबूपाणी, हायड्रेशन सपोर्ट आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

विजेत्यांना रोख पारितोषिके

२१ किलोमीटर आणि १० किलोमीटर या दोन्ही गटांतील विजेत्यांसाठी रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. दोन्ही गटांत प्रथम क्रमांकासाठी ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७ हजार ५०० रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये असे पारितोषिकांचे स्वरूप आहे. यासोबत मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.

ऑनलाईन व ऑफलाईन नावनोंदणीची सुविधा

स्पर्धेसाठी नावनोंदणी www.konfhub.com या संकेतस्थळावर ऑनलाईन करता येणार आहे. तसेच ऑफलाईन अर्ज महाविद्यालयातील विविध विभागांमध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय गोधडीवाला बुक डेपो (सिंधी कॉलनी), रमेश गारमेंट्स (सेंट्रल फुले मार्केट) आणि योगद्वार (सिंधी कॉलनी), जळगाव येथेही अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

यावेळी डॉ. एस. बी. पवार, डॉ. अमोल लांडगे, डॉ. किरण पाटील, डॉ. पंकज पुनासे, एस. आर. गिरासे, जयदेवसिंग रावल, भागवत पाटील, वीरेंद्र मोरे, जे. बी. शिसोदिया, जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
  • जळगाव जिल्हा
  • ताज्या बातम्या
Comments (0)
Add Comment