पाचोरा | पाचोरा शहरातील सुपडू भादू विद्यामंदिर शाळेत बुधवारी एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली. या शाळेतील शिक्षक रवींद्र भारत महाले (रा. दहीगाव संत, सध्या रा. पाचोरा) यांनी मधल्या सुट्टीच्या वेळेत वर्गातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे शाळेत आणि परिसरात खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेचा क्रमवार आढावा : सकाळी साडेदहाच्या सुमारास, जेव्हा विद्यार्थी मधल्या सुट्टीसाठी वर्गाबाहेर गेले होते, त्यावेळी रवींद्र महाले यांनी शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरील एका वर्गात गळफास घेऊन आत्महत्या केली.
सुट्टी संपल्यानंतर वर्गात परतलेल्या विद्यार्थ्यांनी ही धक्कादायक घटना पाहून आरडाओरड केली आणि तात्काळ शिक्षक व शाळा प्रशासनाला माहिती दिली.
पोलीस तपास सुरू, कारण अद्याप स्पष्ट नाही
घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह ताब्यात घेत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, मानसिक तणावामुळे हे टोकाचं पाऊल उचललं असावं, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे.
स्थानिकांत हळहळ, विद्यार्थ्यांवर परिणाम
घटना शाळा सुरू असताना घडल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक स्तरावरही एक संवेदनशील शिक्षक अशी महाले यांची ओळख होती. त्यांच्या या अचानक निर्णयामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.