मुक्ताईनगर – आदिशक्ती संत मुक्ताई आषाढी वारी पालखी सोहळा २०२५ अंतर्गत पालखी सोहळा दि.२७ रोजी वाकवड (ता.भूम) येथील श्री संत बाळूमामा मंदिर परिसरात पोहचताच पालखी सोहळ्याचे ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त भंडाऱ्याच्या उधळणीत आणि जयघोषात स्वागत करण्यात आले. पालखी दर्शनासाठी हजारो भाविक आणि वारकरी उपस्थित होते.
लांबचा पायी प्रवास करून आलेल्या वारकऱ्यांनी थकवा झटकून टाकत भंडाऱ्याच्या उधळणीत भिजत मुक्ताई व बाळूमामांच्या जयघोषात बेभान होऊन नृत्य केले. “जय संत बाळूमामा! जय मुक्ताई माऊली!” च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. वाकवड गावातील नागरिकांनी औक्षण, रांगोळी, पुष्पवृष्टी आणि खाद्यपदार्थांच्या सेवा देत वारकऱ्यांचे मनोभावे स्वागत केले.
सोहळ्याचा पुढील टप्पा: पालखी सोहळा शनिवार, दि. २८ जून २०२५ रोजी वारीच्या २३ व्या दिवशी भूम (ता. भूम, जि. धाराशिव) येथे दुपारचा विसावा आणि रात्रीचा मुक्काम करणार आहे. संपूर्ण भूम नगरी भक्तिरसात न्हालेली असून, पालखीच्या स्वागतासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि सेवा प्रकल्पांचे आयोजन करण्यात आले आहे.