यवतमाळ (प्रतिनिधी) – शहरातील वंजारी फैल भागात अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या भोंदूबाबाने गुप्तधनाच्या लालसेपोटी एका महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलीला सात महिन्यांपासून घरात डांबून ठेवत अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी वेळीच कारवाई करत पीडितांची सुटका केली असून, आरोपी महादेव परसराम पालवे (वय ४४) याला ताब्यात घेतले आहे.
छाप्यानंतर पोलिसांच्या कारवाईने घाबरलेल्या पालवेने चाकूने स्वतःच्या मानेवर वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला असून सध्या तो रुग्णालयात उपचार घेत आहे.
गोपनीय माहितीवरून पोलिसांचा छापा
यवतमाळ शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर वंजारी फैल परिसरातील घरात छापा टाकण्यात आला. पोलिसांना घटनास्थळी महादेव पालवे, त्याची पत्नी, मुलगी, आणि पीडित महिला व तिची सोळा वर्षीय मुलगी सापडले. पोलिसांनी पालवेची चौकशी करताच त्याने अचानक घरात जाऊन स्वतःवर चाकूने वार केला.
सात महिन्यांची कैद आणि अमानुष अत्याचार
पोलिसांनी संपूर्ण घराची झडती घेतली असता तिथे जादूटोणा, गुप्तधनाशी संबंधित साहित्य आढळले. पीडित महिला व तिच्या मुलीने सांगितले की, गेल्या सात महिन्यांपासून त्यांना एका खोलीत डांबून ठेवून नियमितरित्या चटके व मारहाण केली जात होती. त्यांना अन्न-पाण्यावाचून जगवले जात होते.
वर्षभरापासून सुरु होते अघोरी कृत्य
या अघोरी कृत्यांची सुरुवात जवळपास वर्षभरापासून सुरू होती. गुप्तधन मिळवण्यासाठी तांत्रिक पूजा आणि अमानुष प्रकार केले जात असल्याचे पीडितांनी सांगितले. पोलिसांनी संशयित वस्तू जप्त केल्या असून, यामागे आणखी कोणाचा हात आहे का, याचा तपास सुरु आहे.