शनिशिंगणापूर देवस्थानात बोगस भरतीचा पर्दाफाश

मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेत तपशीलवार माहिती

मुंबई |  शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये तब्बल २,४७४ बनावट कर्मचारी दाखवून कोट्यवधींचा पगार घोटाळा केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा घोटाळा थेट विधानसभेत उघड करताना संबंधित भ्रष्ट विश्वस्तांवर फौजदारी कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले.

नेवासेचे आमदार विठ्ठल लंघे यांनी या प्रकरणाबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “भक्तांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत धर्मस्थळांवर भ्रष्टाचार करणाऱ्यांना त्यांच्या योग्य जागी बसवले जाईल.”

२५८ वरून थेट २,४७४ कर्मचारी!

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी देवस्थानाचा कारभार फक्त २५८ कर्मचाऱ्यांद्वारे सुरळीत रित्या चालवला जात होता. मात्र, पुढे तब्बल २,४७४ कर्मचाऱ्यांची खोटी भरती दर्शवून, स्थानिक कार्यकर्त्यांच्या खात्यांमध्ये पगाराच्या नावाखाली पैसे वर्ग करण्यात आले.

या प्रकरणात चौकशीसाठी आधीच समिती नेमण्यात आली होती. तिचा अहवाल सादर होताच, घोटाळ्याचे गांभीर्य समोर आले. फडणवीस म्हणाले, “देवाच्या घरातही किती मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होऊ शकतो, याचा हा भीषण नमुना आहे.”

कायदेशीर कारवाईचे आदेश

मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी विधी व न्याय विभागाला फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून, पोलीस दलाला स्वतंत्र तपास पथक पाठवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. यापूर्वी झालेल्या तक्रारींवर आधारित विशेष ऑडिटदरम्यान धर्मादाय विभागाच्या एका अधिकार्‍याने या प्रकरणाला क्लीन चिट दिली होती. त्यामुळे आता विशेष पथकाकडून नव्याने व सखोल चौकशी केली जाणार आहे.

बनावट अ‍ॅप व सायबर चौकशी

आमदार लंघे यांनी केलेल्या आणखी एका गंभीर आरोपानुसार, बनावट मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून पूजेचे पैसे स्वीकारले जात होते. याप्रकरणाचा तपास सायबर पोलीस दलाच्या अतिरिक्त महासंचालकांच्या देखरेखीखाली होणार आहे.

नव्या समितीची तयारी

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, पंढरपूर आणि शिर्डीप्रमाणे शनिशिंगणापूरसाठीही नवीन देवस्थान समितीची स्थापना लवकरच केली जाईल. यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, अंमलबजावणीही तातडीने केली जाईल.

बातमी शेअर करा !
  • Uncategorized
Comments (0)
Add Comment