मुंबई – राज्यात दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा होत असताना मानखुर्द परिसरात दुर्दैवी घटना घडली. महाराष्ट्र नगर येथे दहीहंडीची रस्सी बांधताना जगमोहन शिवकिरन चौधरी (३२) हा गोविंदा खाली पडला. त्याला तातडीने गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले.
मुंबईत आतापर्यंत ३० जण जखमी
विविध सरकारी आणि बीएमसी रुग्णालयांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण ३० गोविंदा जखमी झाले आहेत. त्यापैकी १५ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून १५ जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत.
-
मुंबई शहर : १८ जखमी (१२ उपचार सुरू, ६ डिस्चार्ज)
-
मुंबई पूर्व उपनगर : ६ जखमी (३ उपचार सुरू, ३ डिस्चार्ज)
-
मुंबई पश्चिम उपनगर : ६ जखमी (१ उपचार सुरू, ५ डिस्चार्ज)
-
एकूण : ३० जखमी (१५ उपचार सुरू, १५ डिस्चार्ज)
दहिसरमध्ये सरावावेळी ११ वर्षीय मुलाचा मृत्यू
याआधी रविवारी दहिसर येथे दहीहंडीच्या सरावादरम्यान ११ वर्षीय मुलगा मृत्युमुखी पडला. तो सहाव्या थरावर उभा असताना तोल गेल्यामुळे खाली पडला. विशेष म्हणजे हा सराव पोलिसांच्या परवानगीशिवाय सुरू असल्याचे समोर आले आहे.
सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दहीहंडी उत्सवात अपघातांच्या घटना घडत आहेत. हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, गादी यांसारख्या सुरक्षेच्या साधनांचा वापर टाळला जात असल्याने जीवितहानी होत असल्याची टीका होत आहे. तसेच आपत्कालीन रुग्णवाहिका व तत्काळ उपचारांची व्यवस्था असणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
पावसातही उत्सवाचा उत्साह कायम
मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस होत असूनही दहीहंडीची उत्सवमय धामधूम सुरू आहे. शहरातील विविध भागांत दहीहंडी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली.
रुग्णालयातील उपचार व्यवस्था
-
कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तीन जखमींवर उपचार सुरू आहेत.
-
के.ई.एम. रुग्णालयात जखमी गोविंदांसाठी विशेष डॉक्टरांची टीम सज्ज आहे. सकाळपासून २२ जखमी दाखल झाले असून त्यापैकी २१ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.