जळगाव (एरंडोल तालुका): एरंडोल तालुक्यातील वरखेडी शिवारात विजेच्या झटक्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना गट क्रमांक 21 मधील शेतात घडली असून प्राथमिक तपासात विजेच्या तारेचा शॉक लागून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या घटनेत दोन महिला (वय अंदाजे 40 वर्षे), एक पुरुष (वय 45 वर्षे), एक मुलगी व आठ वर्षांचा मुलगा असा पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र दैवयोगाने दीड वर्षांची मुलगी सुखरूप बचावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतामध्ये पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतमालकाने झटका देणारी विद्युत तार लावली होती. परंतु कुटुंबातील सदस्यांना याची कल्पना नसल्याने हा अपघात घडला. मृत्यू पावलेले सर्वजण मध्य प्रदेशातील आदिवासी पावरा समाजातील असून मजुरीसाठी जळगावात आले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. शेतमालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.