पुणे – खराडीतील कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती व माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांनी अमली पदार्थांचे सेवन केले नसल्याचे प्रादेशिक न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या (फॉरेन्सिक) अहवालातून स्पष्ट झाले आहे. खेवलकर यांनी दीड महिन्यांहून अधिक काळ तुरुंगवास भोगल्यानंतर २५ सप्टेंबर रोजी त्यांना जामीन मंजूर झाला.
काय आहे प्रकरण?
पुणे पोलिसांनी २७ जुलै रोजी खराडीतील एका हॉटेलवर छापा टाकून प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना अटक केली होती. तेथून कोकेन व गांजा जप्त करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला होता. त्याआधी २५ जुलैलाही त्याच ठिकाणी पार्टी झाली होती, असेही पोलिसांनी सांगितले होते.
अटकेनंतर आरोपींच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातून खेवलकर यांनी ड्रग्जचे सेवन केले नव्हते, हे स्पष्ट झाले आहे. मात्र त्यांच्या ‘इन्स्टाग्राम चॅट’ मध्ये अमली पदार्थ मागविल्याचे काही संदेश असल्याचा दावा पोलिसांनी आरोपपत्रात केला आहे. त्यामुळे ड्रग्ज सेवनाचा आरोप बाद झाला असला, तरी अमली पदार्थ बाळगणे व पार्टीचे आयोजन या बाबींचा तपास अद्याप सुरू आहे.
गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी स्पष्ट केले की, “आरोपींनी ड्रग्ज सेवन केले होते की नाही, हा मुद्दा गौण आहे. त्यांनी अमली पदार्थ कुठून आणले, का बाळगले, हे महत्त्वाचे आहे.”
एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया
“मी सुरुवातीपासूनच सांगत होतो की या कथित रेव्ह पार्टीत काहीही तथ्य नाही. पोलिसांनी हे प्रकरण उभारले. आता न्यायालय जे ठरवेल ते आम्ही मान्य करू. फॉरेन्सिक अहवालातही सेवनाचे पुरावे नाहीत,” असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.