हवालदाराचा 20 हजारांच्या लाचेचा प्रयत्न उघड; लाचलुचपत विभागाची कारवाई

रावेर – तालुक्यातील निंभोरा येथील पोलीस हवालदार सुरेश पवार यांनी तक्रारदाराकडून लाच मागितल्याचे उघड झाले असून, या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार हे छोटे व्यापारी असून त्यांनी काही शेतकऱ्यांकडून १ लाख २७ हजार रुपये किमतीचा केळीचा माल खरेदी करून दिल्ली येथील व्यापाऱ्यास विकला होता. मात्र संबंधित शेतकऱ्यांना पैसे न दिल्याने त्यांनी निंभोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीची चौकशी सुरू असताना, हवालदार सुरेश पवार यांनी तक्रारदारास तक्रार अर्जातील रकमेच्या अंदाजे १० टक्के इतक्या रकमेत लाच मागितल्याचे समोर आले. तक्रारदाराने ही बाब ०७ ऑक्टोबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्याकडे कळवली. ACBच्या पडताळणीत, हवालदार पवार यांनी चौकशीमध्ये मदत करण्याच्या नावाखाली आणि गुन्हा नोंद न करण्यासाठी तक्रारदाराकडून २० हजारांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी हवालदार सुरेश पवार यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगावचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, पोहे. का. किशोर महाजन, महिला पोहे. का. संगीता पवार, पो.कॉ. राकेश दुसाने, अमोल सुर्यवंशी आणि भूषण पाटील यांचा समावेश होता.

बातमी शेअर करा !
  • क्राईम
  • जळगाव जिल्हा
  • ताज्या बातम्या
Comments (0)
Add Comment