जळगाव – शहरातील खोटे नगर परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोटे नगर येथील रहिवासी योगेराज पुंडलिक पाटील हे १० डिसेंबरपासून पत्नीसमवेत नेपाळ येथे देवदर्शनासाठी गेले होते. घर बंद असल्याने त्यांच्या घराची देखरेख भाऊ ज्ञानेश्वर पाटील करत होते. मंगळवारी (१६ डिसेंबर) दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर पाटील घराची पाहणी करण्यासाठी गेले असता, मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळून आले.
घरात प्रवेश केल्यानंतर संपूर्ण सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. अज्ञात चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश करत कपाटातून १० हजार रुपये रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने असा एकूण सुमारे २२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे निष्पन्न झाले. ही चोरी भरदिवसा घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच ज्ञानेश्वर पाटील यांनी तातडीने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत बदर हे करत आहेत.