प्रभाग ५ मध्ये महायुतीची दणदणीत महारॅली

उत्स्फूर्त जनसमर्थनातून विजयाचा विश्वास

जळगाव | जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ मध्ये महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या भव्य महारॅलीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन व पॅनल प्रमुख नितीन लढ्ढा यांच्या हस्ते हनुमान मंदिरात नारळ वाढवून या प्रचार रॅलीचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या शक्तीप्रदर्शनातून महायुतीने विजयाचा निर्धार स्पष्ट केला.

या महारॅलीला जळगावच्या खासदार स्मिता वाघ, शहराचे आमदार सुरेश भोळे, चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि रिपाइं महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हनुमान मंदिर व गोलाणी मार्केट येथून प्रारंभ झालेली ही रॅली गायत्री मंदिर परिसर, गुरुद्वारा, नटराज टॉकीज, पांडे डेअरी चौक, गणेश वाडी आदी प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ झाली. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी तसेच महिला व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. विविध ठिकाणी उमेदवारांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.

विकासाच्या मुद्द्यांवर ठाम भूमिका

प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांनी व उमेदवारांनी शहराच्या सर्वांगीण विकासावर भर दिला.
– जळगाव शहर खड्डेमुक्त करण्यासह अमृत योजनेतील कामे वेळेत पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
– केंद्र व राज्यातील डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून जळगावच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले.
– प्रभागातील पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर विशेष लक्ष दिले जाईल, असे सांगण्यात आले.
– हायटेक सीसीटीव्ही आणि दर्जेदार पथदिव्यांद्वारे महिला व नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची ग्वाही देण्यात आली.

उमेदवारांचा जनतेशी थेट संवाद

प्रभाग क्रमांक ५ मधील उमेदवार विष्णू रामदास भंगाळे, मंगला संजय चौधरी, आशा रमेश पाटील आणि नितीन बालमुकुंद लढ्ढा यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला. महायुतीच्या या प्रचार रॅलीला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देत ‘अब की बार, महायुती सरकार’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या भव्य महारॅलीचा समारोप भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश पाटील यांच्या निवासस्थानी करण्यात आला.

बातमी शेअर करा !
  • जळगाव जिल्हा
  • ताज्या बातम्या
Comments (0)
Add Comment