नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी नितीन नवीन यांच्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीबद्दल अभिनंदन करताना, पक्षाशी संबंधित बाबींमध्ये ते आपले बॉस असतील, असे स्पष्ट केले. दिल्लीतील भाजप मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात संघटन पर्वाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
मोदी म्हणाले की, ४५ वर्षीय नितीन नवीन हे मिलेनियल पिढीचे प्रतिनिधी असून, त्यांनी बदलत्या भारताचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. जेव्हा पक्षाच्या बाबींचा प्रश्न येतो, तेव्हा नितीन नवीनजी माझे बॉस आहेत. मी एक साधा कार्यकर्ता आहे, असे म्हणत त्यांनी नव्या अध्यक्षांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. भाजपचे पक्ष व्यवस्थापन करण्याबरोबरच एनडीएतील मित्रपक्षांमध्ये समन्वय राखण्याची जबाबदारीही नवीन यांच्यावर असेल, असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या संघटनात्मक इतिहासाचा आढावा घेतला. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या काळात पक्षाने शून्यापासून शिखरापर्यंतचा प्रवास केला, असे ते म्हणाले. पुढे एम. व्यंकय्या नायडू आणि नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचा विस्तार झाला, तर राजनाथ सिंह यांच्या काळात भाजपला पहिल्यांदा स्वबळावर बहुमत मिळाले.
अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली भाजपने अनेक राज्यांत सत्ता मिळवली आणि केंद्रात सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन केले, तर जे. पी. नड्डा यांच्या काळात पंचायत ते संसद स्तरापर्यंत पक्ष अधिक मजबूत झाला, असे मोदी म्हणाले. नितीन नवीन यांच्यात तरुणाईची ऊर्जा आणि अनुभव यांचा संगम असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.