रावेर तालुक्यातून बुऱ्हाणपूरकडे अवैध लाकूड तस्करीचा सुळसुळाट

रावेर – तालुक्यातून शेजारील मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध लाकूड तस्करी होत असल्याचे गंभीर वास्तव समोर येत आहे. या प्रकाराकडे स्थानिक वनविभागाकडून डोळेझाक केली जात असल्याचा आरोप होत असून, त्यामुळे पर्यावरणप्रेमी व वृक्षप्रेमींमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडच्या काळात लाकूड तस्कर पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, सध्याचे वनक्षेत्रपाल श्रीकांत काळे यांच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये शंका व्यक्त केली जात आहे. यापूर्वी तत्कालीन वनक्षेत्रपाल अजय बावणे यांच्या कार्यकाळात अवैध वृक्षतोड व लाकूड तस्करीवर मोठ्या प्रमाणात आळा घालण्यात आला होता. मात्र सध्याच्या काळात ही नियंत्रण व्यवस्था कमकुवत झाल्याची चर्चा जोर धरत आहे.

जंगल संपदेची खुलेआम होत असलेली लूट आणि त्यावर प्रभावी कारवाईचा अभाव यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जंगल क्षेत्रात वेगाने होत असलेली वृक्षतोड ही भविष्यासाठी गंभीर इशारा असल्याचे पर्यावरणप्रेमी सांगत आहेत.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच अवैध लाकूड तस्करी तात्काळ थांबवावी, अशी जोरदार मागणी वृक्षप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा !
  • Uncategorized
Comments (0)
Add Comment