वाळूचे ट्रॅक्टर सोडण्यासाठी 30 हजारांची लाच

उत्राण येथील दोघा तलाठ्यांना जळगाव एसीबीची अटक

भुसावळ | वाळूने भरलेले ट्रॅक्टर सोडण्याच्या मोबदल्यात 30 हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना उत्राण, ता. एरंडोल येथील दोघा तलाठ्यांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवार, 27 जानेवारी रोजी सायंकाळी रंगेहाथ अटक केली. या धडक कारवाईमुळे महसूल विभागातील लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये उत्राण सजा अहिर हद्द तलाठी नरेश भास्कर शिरुड (वय 41, रा. वाघनगर, जळगाव) आणि उत्राण सजा गुजर हद्द तलाठी शिवाजी एकनाथ घोलप (वय 46, रा. हरिओम नगर, नाशिक, मूळ रा. पहूर पेठ, ता. जामनेर) यांचा समावेश आहे.

लाच प्रकरणाची पार्श्वभूमी
तक्रारदार वाळू वाहतुकीचा व्यवसाय करतात. मंगळवार, 27 जानेवारी रोजी उत्राण येथील गिरणा नदीपात्रातून वाळू वाहतूक करत असताना तलाठी नरेश शिरुड यांनी तक्रारदाराचे ट्रॅक्टर पकडले. पुढील कारवाई टाळण्यासाठी सुरुवातीला 25 हजार रुपयांची लाच मागण्यात आली. मात्र तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत जळगाव एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर लाच पडताळणी करण्यात आली. दरम्यान, “इतरांकडून जास्त पैसे घेतो, पण तू गरीब आहेस म्हणून 30 हजार दे,” असे सांगत शिरुड यांनी लाच मागणी कायम ठेवली. यावेळी तलाठी शिवाजी घोलप यांनीही लाच मागणीस पाठबळ दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. ग्रामपंचायत कार्यालयातील एका खोलीत लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने दोघांनाही सायंकाळी अटक केली.

आरोपींकडून रोख रक्कम व साहित्य जप्त
कारवाईदरम्यान आरोपी नरेश शिरुड याच्याकडून एक लाख 73 हजार 300 रुपयांची रोकड, दोन हजार 950 रुपये किमतीचे महागडे मद्य तसेच ओप्पो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

एसीबी पथकाची यशस्वी कारवाई
ही कारवाई जळगाव एसीबीचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, तसेच अंमलदार प्रदीप पोळ, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

बातमी शेअर करा !
  • जळगाव जिल्हा
  • क्राईम
  • ताज्या बातम्या
Comments (0)
Add Comment