जळगाव : येथे दिव्यांग प्रमाणपत्रातील टक्केवारीत गंभीर तफावत आढळून आल्याने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या 16 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांची प्रथम खात्यांतर्गत चौकशी करण्यात येणार असून त्यानंतर थेट बडतर्फी अथवा इतर कठोर शिक्षात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या वतीने दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरीत असलेल्या कर्मचाऱ्यांची सखोल तपासणी सुरू आहे. आवश्यक प्रमाणपत्र नसतानाही दिव्यांग सवलतीचा लाभ दिला गेला असल्यास संबंधित कर्मचाऱ्यांसोबतच वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे.
तपासणीदरम्यान काही कर्मचाऱ्यांनी 40 टक्क्यांहून अधिक दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्र सादर करून नोकरीतील सवलती घेतल्याचे समोर आले आहे. मात्र वैद्यकीय तपासणीत या कर्मचाऱ्यांचे प्रत्यक्ष दिव्यांगत्व केवळ 3 ते 4 टक्के असल्याचे निष्पन्न झाले आहे.
कोणत्या विभागातील कर्मचारी निलंबित?
दिव्यांगत्व अधिक दाखवणारी प्रमाणपत्रे कुठे व कशा पद्धतीने तयार करण्यात आली, याचीही स्वतंत्र चौकशी केली जाणार असून त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आतापर्यंत निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, लेखा विभाग तसेच पंचायत समिती आणि ग्रामपंचायत विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.