घंटागाड्यांचा भंगार व्यापार; मेडिकल वेस्ट खुलेआम टाकण्याचा प्रकार उघड
जळगाव : जळगाव महापालिकेच्या हद्दीतील जेके पार्क (मेहरूण तलावाजवळ) परिसरात उद्यानाच्या ठिकाणी नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणावर मेडिकल वेस्ट टाकला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे, याठिकाणी महापालिकेच्या घंटागाड्यांचे अनधिकृत डेपो तयार झाले असून, त्याद्वारे भंगार विक्रीचा व्यवहारही सुरू असल्याचे उघड झाले आहे.
सफाईसाठी महापालिकेच्या घंटागाड्या वापरण्यात येतात. मात्र, शहरातील घंटागाड्यांचे चालक कचऱ्यातील प्लास्टिक, लोखंड व इतर साहित्य वेगळे करून खुल्या ठिकाणी विक्री करत असल्याचे प्रकार उघड झाले आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी, प्रदूषण आणि आरोग्यधोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
जेके पार्क परिसरात सापडलेले वापरलेले सिरींज, रक्ताने माखलेले कापसाचे बोळे, पॅकेट कव्हर्स यांसारखा मेडिकल वेस्ट थेट उघड्यावर टाकण्यात येत आहे. हा संपूर्ण प्रकार शासनाच्या जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियमांचा थेट भंग करणारा आहे.
या प्रकरणी नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारी केल्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. मात्र, महापालिका आयुक्त निर्मल गायकवाड निवडणूक आयोगाच्या बैठकीसाठी अनुपस्थित असल्यामुळे तातडीने हस्तक्षेप होऊ शकला नाही.
शहरातील मुख्य मार्ग स्वच्छ ठेवले जात असले तरी अंतर्गत गल्ल्यांतील स्थिती मात्र गंभीर आहे. कचरा संकलनाचे कंत्राटदार योग्य रीतीने काम करत आहेत का, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.