मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या तीन आठवड्यांपासून ठाम असलेल्या कर्मचार्यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन करूनही कर्मचारी दाद देत नसल्याने एसटी महामंडळाने अखेर संपकर्यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यास सुरुवात केली.
शुक्रवारी महामंडळाने रोजंदारीवरील 238 कर्मचार्यांची सेवा समाप्त केली तर 297 कर्मचार्यांना निलंबित केले.
महामंडळाने आतापर्यंत एकूण 2 हजार 776 कर्मचार्यांना निलंबित केले आहे. याशिवाय धुळे, जळगाव येथे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना कामावर घेण्यास सुरुवात केली असून सोमवारपासून हे चालक महामंडळात रुजू होणार आहेत.
आवाहन करूनही कर्मचारी कामावर येत नसल्याने महामंडळाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आतापर्यंत 2776 कर्मचार्यांना निलंबित केले आहे. निलंबनाच्या कारवाई नंतरही कामावर येणार्या कर्मचार्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे महामंडळाने कारवाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला.
एसटी महामंडळात संपूर्ण राज्यात दोन हजारपेक्षा जास्त रोजंदारीवरील कर्मचारी असून यात चालक व वाहकही आहे. संपात हे कर्मचारीही सहभागी झालेत. या कर्मचार्यांना 24 तासांचे अल्टीमेटम दिले आहे. तरी जे कर्मचारी कामावर आले नाहीत, अशा 238 कर्मचार्यांची सेवा समाप्त केली आहे.
दोन महिन्यात भाडेतत्त्वावरील 500 बस येणार
ग्रामीण भागाकरिता एसटीच्या ताफ्यात येत्या दोन महिन्यात भाडेतत्त्वावरील बी एस-6 प्रणालीच्या 500 बस येणार आहेत. या बस सात वर्षाकरिता भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असून पहिली पाच वर्षे या बसेस दिवसाला प्रत्येकी 400 कि.मी. अंतर धावणार आहेत. महामंडळाच्या राज्यातील सात विभागांकरिता साध्या बस सात वर्षांकरिता भाडेतत्त्वावर येणार आहेत. भाडेतत्त्वावर बस पुरविणे, त्याचे चालन व देखभालीची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असेल. तसेच चालक देखील कंत्राटी असणार आहे.
एस.टी. कर्मचारी मागणीवर ठाम
एस.टी.चे शासनामध्ये विलीनीकरण केले तर आम्हाला शासनाच्या सेवा व सुविधा मिळतील. विविध कर कमी होतील. 10 ते 12 हजार पगारावर एस.टी.चे.कर्मचारी काम करतात. यासाठी एस.टी.चे शासनामध्ये विलीनीकरण हाच एकमेव पर्याय असल्याचे कर्मचार्यांतून सांगण्यात आले.
आंदोलन थांबणार नाही, कर्मचारी आक्रमक
एस.टी. बस कर्मचार्यांनी पुकारलेल्या आंदोलनातून आता निर्णय झाल्याशिवाय माघार नाही. हे आंदोलन थांबणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व आमदार सदाभाऊ खोत यांनी मुंबई येथे शुक्रवारी दिला. आंदोलनाचा हा दहावा दिवस आहे.
आझाद मैदानची गर्दी वाढणार
विलीनीकरणाचा लढा अंतिम टप्प्यात आहे. प्रत्येक आगारातील किमान 100 कर्मचार्यांनी आझाद मैदानला या असे भावनिक आवाहन सोशल मीडियावर केले जात आहे. येताना गरजेच्या आवश्यक वस्तू घेऊन येण्यास सांगितले जात आहे.त्यामुळे येत्या दोन दिवसांत आझाद मैदानावरील एसटी कर्मचार्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी 131 बसेस धावल्या
शुक्रवारी दिवसभरात 131 एसटी राज्यातील विविध मार्गावर धावल्या. त्यातून तीन हजार 517 प्रवाशांनी प्रवास केला.