चालकाच्या डुलकीमुळे विनायक मेटेंचा अपघात? अजित पवार म्हणाले…

मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे आज अपघाती निधन झालं आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. विनायक मेटेंच्या निधनावर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. अशातच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चालकाला झोप आल्यामुळे अपघात घडला असावा, असा अंदाज व्यक्त केला आहे.

 

अजित पवार म्हणाले की, विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनानं मराठवाड्याचा कर्तृत्ववान सुपुत्र, मराठा चळवळीचं खंबीर नेतृत्वं हरपलं आहे. मी माझा निकटचा सहकारी गमावला आहे.

 

महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांची जाण असलेलं, मराठा समाज आणि मराठवाड्याच्या विकासासाठी कार्यशील असलेलं त्यांचं नेतृत्वं होत. महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात प्रदीर्घ काळ सोबत असलेले ते माझे सहकारी होते. त्यांचं अकाली निधन हा महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आहे, अशा शोकभावना अजित पवार यांनी व्यक्त केल्या.

 

तसेच, मुख्यमंत्र्यांनी आज बोलावलेल्या बैठकीसाठी ते येत होते. रात्रभर प्रवास करून येत असताना चालकाला डुलकी लागली असावी आणि त्यातून हे सगळं घडलं, असे माझे मत आहे. आम्ही सगळे राजकीय क्षेत्रात काम करणारे लोक अथवा इतर कोणत्याही क्षेत्रातल्या लोकांनी रात्रभर प्रवास करणं हे नेहमी टाळलं पाहिजे. पण वेळ महत्त्वाची असते, त्यामुळे अनेकदा ते टाळणं शक्य होत नाही. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यातून चित्र स्पष्ट होईल, असे अजित पवार यांनी म्हंटले आहे.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment