नवाब मलिक ३ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत; न्यायालयाचा निर्णय

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे मलिक यांच्या अडचणी वाढल्या असल्याचं पाहायला मिळत आहे. नवाब मलिक यांना आज अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची मेडिकल चाचणी झाल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. जवळपास अडीच तासापेक्षा अधिक वेळ दोन्ही बाजूने युक्तीवाद पार पडल्यानंतर कोर्टाने नवाब मलिक यांना 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मलिक यांना घरचं जेवण  घेण्याची परवागनी देण्यात आली आहे.

 

 

कोठडी सुनावल्यानंतर मलिकांचा सूचक इशारा

दरम्यान, नवाब मलिक यांना 8 दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आल्यानंतर नवाब मलिक यांनी एक ट्वीट करत भाजपला सूचक इशारा दिलाय. ‘कुछ ही देर की ख़ामोशी है फिर शोर आएगा… तुम्हारा तो सिर्फ वक़्त है हमारा दौर आएगा !’, असं ट्वीट मलिकांनी केलंय.

 

 

नवाब मलिकांना अटक का?

3 फेब्रुवारीला एनआयएने दाऊत विरोधात गुन्हा दाखल केलाय. मनी लॉन्ड्रिंग, ड्रग्ज तस्करी तसंच अन्य गुन्ह्यात दाऊदचा सहभाग आहे, असं ईडीचे एएसजी अनिल सिंग यांनी न्यायालयात याची माहिती दिली आहे. इतकंच नाही तर मलिक आणि दाऊद यांच्यात कसे संबंध आहेत, हे देखील त्यांनी न्यायालयात सांगितलं. त्यानुसार दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर दाऊदचा कारभार पाहत होती. तिच्याकडून मलिक यांनी दाऊदची बेनामी संपत्ती विकत घेतल्याचा आरोप करण्यात आलाय.

 

दाऊदची 200 कोटी रुपयांची संपत्ती कमी किंमतीत विकत घेतली. हा व्यवहार रोखीने झाला. त्यात 55 लाखाचा व्यवहार झाला. मलिक यांच्या कुटुंबाच्या एका कंपनीकडे या संपत्तीची मालकी आहे. या कंपनीवर मलिक यांचा मुलगा संचालक आहे. काही काळ ही कंपनी मलिक यांच्या नियंत्रणाखाली होती, असा आरोप सिंग यांनी कोर्टात केलाय. इतकंच नाही तर कुर्ल्यातील मालमत्ता मरियम आणि मुनिरा या दोघींच्या नावावर करण्यात आली होती. ही जमीन मुळात दाऊद गँगच्या हस्तकांशी संबंधित होती. ही जमीन सलीम पटेलची होती आणि तो अंडरवर्ल्डशी संबंधित होता. ती संपत्ती आता मलिक यांच्या कंपनीकडे आहे, असंही सिंग यांनी म्हटलंय.

 

महाविकास आघाडी आक्रमक, आंदोलनाचा इशारा

मलिकांवरील कारवाईनंतर महाविकास आघाडी आक्रमक भूमिका घेणार आहे. महाविकास आघाडीचे मंत्री आणि नेत्यांकडून भाजपविरोधात आंदोलन पुकारण्यात आलंय. ‘आता आम्ही सर्वजण बसलो होतो. आमी सर्वजण एकत्रितपणे कायदेशीररित्या जनतेत जाऊन मुकाबला करु. उद्या सकाळी 10 वाजता मंत्रालयाशेजारी महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आम्ही मंत्री निषेध म्हणून धरणं धरणार आहोत. तसंच परवापासून राज्यातील सर्व तालुका, जिल्हा, शहर पातळीवर शांतपणे मोर्चा आंदोलन, धरणं आम्ही करु’ असा इशारा भुजबळांनी दिलाय.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment