नाट्य संगीत रजनी सुरेल मैफलीने रसिक तल्लीन

सांस्कृतिक कार्यसंचलनायतर्फे बालगंधर्व स्मृतीदिनानिमित्त आयोजन

जळगाव | प्रतिनिधी
बालगंधर्व स्मृती दिनानिमित्ताने “नाट्य संगीत रजनी” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून आयोजन करण्यात आले होते. यात नाट्य, संगीताने असंख्य रसिकांच्या मनात चांदणे फुलविले.
सं. मामापमान नाटकातील नांदीने अर्थात ” नमन नटवरा विस्मयककारा” त्यानंतर प्राजक्ताने सं. स्वयंवर नाटकातील “नाथ हा माझा” हे अजरामर नाट्यपद सादर करून सांस्कृतिक मैफिलीची सुरूवात झाली.
नमन नटवरा विस्मयककारा..या नांदीने रसिकांच्या काळजात कलाकरांनी जागा निर्माण केली. भास्करबुवा बखलेंचे संगित स्वयंवरातील नाट्यपदाने बालगंधर्वांचे स्मरण करून दिले. नाट्यपदांच्या माध्यमातून सुरांची मैफल रंगत गेली. त्यानंतर सं. मत्स्यगंधा नाटकातील “गुंतता हृदय हे” ने रसिकांची दाद दिली.

“मम आत्मा गमला” हे नाट्यपद सादर केले. त्यानंतर देवघरचे ज्ञात कुणाला, ब्रह्ममूर्तीमंत, श्रीरंगा, बहुत दिन नच भेटलो, अवघे गरजे, रमणी मजसी निजधाम, सुरत पिया, नच सुंदरी, युवतीमना, हे सुरांनो अशी एकाहून एक सरस संगीताची मैफल रंगली. नाथ हा माझा…, रूप बली तो…, नयने लाजवित.., यासह भैरवीने नाट्य संगित रजनी मैफलीची सांगता झाली.
सुरूवातीला दीपप्रज्वलन झाले. यावेळी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, डॉ.अनुराधा राऊत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी,कलाकार प्राजक्ता काकतकर व ओंकार प्रभुघाटे यांच्याहस्ते संपन्न झाले.
नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व या नावाने लोकप्रिय असलेले, विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमीवरील अभिनेता, गायक आणि नाट्यनिर्माते. ज्या काळी रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करत नसत त्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री भूमिकांमुळे ज्यांनी मोठी लोकप्रियता कमवली.

अशा थोर बालगंधर्व यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गंत सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून “नाट्य संगीत रजनी” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती संभाजी राजे नाट्य मंदिर येथे केले होते. मराठी संगीत रंगभूमीला लोकप्रिय आणि समृध्द करण्यात बालगंर्धांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअतर्गंत सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून “नाट्य संगीत रजनी” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या सांस्कृतिक कार्यक्रमात प्राजक्ता काकतकर, ओंकार प्रभुघाटे या कलाकारांनी आपली कला सादर केली. तबला साथ धनंजय पुराणिक, ऑर्गन मकरंद कुंडले यांनी दिली. कार्यक्रमाची संकल्पना व सादरीकरण स्व.वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान यांनी केले. कार्यक्रमाचे निवेदन दिप्ती भागवत यांनी केले. मयूर पाटील यांनी गुरूवंदना सादर केली.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment