पक्षकाराकडून वकिलाच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

चाळीसगाव | प्रतिनिधी
किरकोळ कारणावरून चाळीसगाव न्यायालय परिसरात पक्षकाराने वकिलास पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. कागद पत्र देण्यास उशीर केल्याच्या कारणावरून पक्षकाराने चक्क वकिलाच्या अंगावर पेट्रोल टाकल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव न्यायालय परिसरात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नेमका प्रकार काय?
चाळीसगाव येथे वकिली व्यवसाय करणारे एस. टी. खैरनार हे वकील आपल्या नियमित कामकाज करण्यासाठी वकील चेंबरमध्ये बसले होते, त्याचवेळी त्यांचे पक्षकार असलेले 75 वर्षीय किसन सांगळे हे देखील त्यांना भेटण्यासाठी वकील चेंबरमध्ये दाखल झाले, यावेळी कागदपत्र देण्या-घेण्यावरून दोघांमध्ये किरकोळ स्वरूपाची बोलचाल झाली, याच वेळी पूर्ण तयारीनिशी आलेल्या किसन सांगळे यांनी वकील खैरनार यांच्या अंगावर सोबत आणलेले पेट्रोल ओतून त्यांना माचिसने पेटविण्याचा प्रयत्न केला.


याचवेळी शेजारी असलेल्या वकिलांनी त्यांना वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला असला तरी, वकील खैरनार यांच्या अंगावर पेट्रोल पडल्याने त्यांना त्वचा विकाराचा त्रास आणि रक्तदाब वाढल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले असून किसन सांगळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या वर चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या घटने मागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, कागदपत्र देवाणघेवाण करण्यााठी उशीर झाल्याने हे कृत्य करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

या घटनेत वकिलाच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीस कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी चाळीसगाव वकील संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment