पुढच्या महिन्यात येऊ शकते मुलांची कोरोना लस

नवी दिल्ली : देशात मुलांसाठी ऑगस्टपर्यंत कोरोना लस येण्याची शक्यता आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे. मंगळवारी संसद भवनात झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी लसीकरणासंदर्भात खासदारांना माहिती दिली. यादरम्यान, मुलांसाठी ऑगस्ट महिन्यापर्यंत लस येऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे.

देशात सध्या 18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांनाच कोरोना लस देण्यात येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम मुलांवरही बघायला मिळाला आहे. तिसऱ्या लाटेत ही संख्या वाढू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे मुलांसाठीच्या लसीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारत बायोटेकची लस कोव्हॅक्सीनची ट्रायल सुरू आहे. याचा अंतिम निकाल ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत येण्याची आशा आहे. याशिवाय, जायडस कॅडिलाच्या मुलांच्या लसीची ट्रायल पूर्ण झाली आहे. अशात लवकरच हिलाही मंजुरी मिळू शकते. तसेच फायझर, मॉडर्ना सारख्या लसींचेही काम सुरू आहे. लहान मुलांवर त्यांच्या वयानुसार लसीची तीन टप्प्यांत चाचणी घेतली जात आहे. पहिल्या टप्प्यात १२ ते १८, तर दुसऱ्या टप्प्यात ६ ते १२ आणि तिसऱ्या टप्प्यात २ ते ६ वर्षांच्या मुलांचा समावेश आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसींची मुलांवरील चाचणी लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती यापूर्वी केंद्र सरकारनं उच्च न्यायालयाला दिली होती.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment