राष्ट्राचे चारित्र्य निर्माण करण्यासाठी गांधी विचार संस्कार परीक्षेची आवश्यकता: डाॅ. कृष्णा


गांधी विचार संस्कार परीक्षेचा कर्नाटकात बक्षीस वितरण

बंगलोर दि.17 प्रतिनिधी : राष्ट्राचे चारित्र्य निर्माण करण्याची क्षमता गांधी विचारांमध्ये असुन त्यासाठीच गांधी विचार संस्कार परीक्षेची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन कर्नाटक गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डाॅ. वुडी कृष्णा यांनी केले. याप्रसंगी आंध्रप्रदेशचे सेवानिवृत्त पोलिस महानिरीक्षक डाॅ. गांधी पी.सी कझा, गांधी रिसर्च फौंडेशनचे परीक्षा समन्वयक गिरीश कुळकर्णी, कर्नाटक गांधी स्मारक निधीचे उपाध्यक्ष प्रा. जी. बी. शिवराज, एन. आर. विष्णू कुमार, स्टिफन गौडा, कर्नाटक परिक्षा समन्वयक डाॅ. अबिदा बेगम व्यासपीठावर उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय समारोपात डाॅ. कृष्णा यांनी गांधी विचारांची पंचसुत्री स्विकारल्यास चारित्र्य निर्मिती सहज शक्य असल्याचे सांगितले. द्वेषाची परतफेड प्रेमाने करा, अस्पृश्यांना सामावून घ्या, माफी न मागणार्यांनाही क्षमा करा, चुक करणे गैर नाही मात्र पुन्हा ती चुक करु नका व ढोंगीपणाशिवाय साधे रहा हि पंचसुत्री त्यांनी सांगितली. पिंपळाच्या झाडाला पाणी घालुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनपर मनोगतात डाॅ. गांधी म्हणाले कि, जीवनात अंतिम लक्षाचा विचार करीत असतांना त्यासाठी वापरल्या जाणार्या माध्यमाचाही विचार करा. प्रत्येक युवकाने गांधी वाचले पाहिजे, समजले पाहिजे. केवळ बनावट माहितीच्या आधारावर टिका टिपण्णी करु नये.

कर्नाटक राज्याच्या सात जिल्ह्यातील २३ संस्थांमधील सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांनी गांधी विचार संस्कार परीक्षा दिली. १३० विद्यार्थ्यांना आजच्या कार्यक्रमात वेगवेगळी पदके देऊन सन्मानित करण्यात आले. गिरीश कुळकर्णी यांनी गांधी विचार संस्कार परीक्षेची माहिती दिली. उपाध्यक्ष शिवराज यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक डाॅ. अबिदा बेगम यांनी परिक्षेचा निकाल घोषित केला तर स्थानिक समन्वयक लोकेश यांनी सुत्रसंचालन व आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. गांधी भवनच्या महादेव देसाई सभागृहात समन्वयक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment