नाशिक:
जिल्हयात रूग्णसंख्या कमी होत असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र अजूनही जिल्हयात एक हजारांवर कोरोना रूग्ण आहेत. ३१ जूलैपासून यात कोणतीही घट झालेली नाही याउलट काही प्रमाणात वाढ झाली असून ही चिंता करण्यासारखी बाबत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याबरोबरच काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत जिल्हयाच्या एकूण परिस्थितीबाबत बोलतांना सांगितले की, नाशिकमध्ये कोरोनाचे 1073 रुग्ण आहेत. गेल्या काही दिवसात आकडा खाली येत नाही. जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट 1.9 टक्के आहे. तर 139 रुग्ण ऑक्सिजनवर आहे. मृत्यू दर 2.12 टक्के आहे. राज्याच्या दृष्टीने परिस्थिती ठिक आहे. म्युक्रमायकोसिसमध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. म्युक्रमायकोसिसमधून बरे झाले असे 25 टक्केच रुग्ण आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 14 लाख 73 हजार लोकांनी पहिला डोस घेतला आहे. तर 5 लाख 6 हजार 358 लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. एकूण 27.16 टक्के लोकांना एक किंवा दोन डोस दिले आहेत. परंतु बाहेरील देशात संसर्ग वाढतो आहे त्यामुळे आपल्याला अधिक काळजी घेण्याची गरज आहे. आजही ग्रामीण भागात लोक मास्क वापरतांना दिसत नाही असा निष्काळजीपणा केल्यास तिसरी लाट फार लांब नसल्याचे सांगत नागरीकांनी खबरदारी बाळगावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किशोर श्रीवास आदी उपस्थित होते.