नाशिक : तीन वर्षांपूर्वी शुन्यातून स्वप्न बघत एक सामान्य कुटुंबातील युवक आपला प्रवास सुरु करतो आणि मेहनतीला यश येत ते थेट झी म्युझिक मराठी सोबत स्वतः गाण्याच्या निर्मितीतून. हा प्रेरणादायी प्रवास आहे सामान्य घरातील प्रोड्युसर, कवी, अभिनेता आणि गीतकार अशा चौफेर भूमिका निभावत स्वप्नपूर्तीचा दिवस पाहणारा अष्टपैलू युवक अशोक शिंदे यांचा.
कोविड19 च्या सर्व नियमांचे पालन करीत अल्पशा उपस्थितीत संवादिनी कलामंच आणि झी म्युझिक मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत ‘तू येतेस मनी’ या अल्बमचं पोस्टर लॉंच मोठ्या उत्साहात करण्यात आलं. IICMR कॉलेज च्या प्राचार्या डॉ. दिपाली सवाई आणि माजी महापौर राजू मिसाळ यांच्या हस्ते अल्बमचं पोस्टर लॉन्चिंग झालं. अल्बमचे संगीतकार, दिग्दर्शक व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संवादिनी वादक संतोष घंटे यांनी या अल्बमचा प्रवास आणि पार्श्वभूमी यावेळी उपस्थितांना सांगितली. सर्व स्तरावरून अशोकचे कौतुक होत असून तो एक प्रेरणा म्हणून सर्वांच्या समोर आला असल्याचे प्रतिपादन माजी महापौर राजू मिसाळ यांनी केले. तर प्राचार्या डॉ. दिपाली सवाई म्हणाल्या की, मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त आपल्या आवडीनुसार कलागुण जोपासण्यास वाव दिला तर ते दिपस्तंभ बनत समोर येतात हेच आज अशोकने सिद्ध केले आहे.
आपल्या प्रवासाविषयी बोलतांना अशोक शिंदे म्हणाले की, ‘मला कविता लिहिण्याची आणि कवितांना चाल लावण्याची आवड असल्यामुळे आपलं ही गाणं एक दिवस असं मोठ्या पडद्यावर रिलीज व्हावं अशी इच्छा होती. ते स्वप्न आज पूर्ण होतंय. खुप जणांची मेहनत आणि पाठिंबा होता म्हणूनच मी इथवर पोहोचू शकलो. माझं स्वप्न, संतोष सरांनी त्यांचं स्वतःचं असावं इतकं सावली सारखे ते या प्रवासात माझ्या सोबत आहेत. सिटी वन स्टुडिओचे मंदार ढुमने यांनी रेकॉर्डिंगसाठी वेळोवेळी मदत केली. व्हिडीओ मध्ये माझ्यासोबत असलेली तेजल जवळकर. तिने मला कॅमेरा फेस करायला आणि कॅमेरासमोर सहज अभिनय कसा होईल यासाठी प्रोत्साहन दिलं. रेसोनान्स स्टुडिओ, IDAM स्टुडिओ यांचंही सहकार्य यात लाभलं. तर प्रसिद्ध गायक ह्रिषीकेश रानडे यांच्या आवाजात स्वरबद्ध झालेलं हे गाणं सगळ्यांनी अवश्य बघावे व आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात असे आवाहन अशोक शिंदे यांनी यावेळी केले आहे.