जळगाव :- मागील वर्षी करोनामुळे मावळलेल्या उत्साहातच जेमतेम दिवाळी साजरी करण्यात आली होती. यंदा मात्र करोनाचे सावट
मावळतीकडे झुकल्याचे चित्र आहे. करोनावर विजय मिळवत आलेला, दिवाळीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यासाठी जळगावकर सज्ज झाले आहेत. फराळाचा घमघमाट अन् खरेदीची रेलचेल शहराच्या रस्त्यांवर दिसून येत आहे. पर्यावरणपुरक इकोफ्रेंडली आकाश दिव्यांचे स्टॉल लक्षवेधी ठरत आहेत. क रोनाच्या
महासंकटामुळे मागील दिङ वर्षात पहिल्या व दुसऱ्या वर्षात मोठी हानी झाली. उद्योग, व्यवसाय ठप्प होतेच,तसेच अनेकांचे रोजगारही गेले. मागील वर्षी करोनावर लस उपलब्ध नव्हती, पण २०२१ मध्ये लस उपलब्ध झाल्यामुळे दिलासा मिळाला, पण जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात दुसऱ्या लाटेने मोठे नुकसान केले.
मे महिन्यानंतर लागू केलेल्या कडक लॉकडाऊनमुळे करोना नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली.निर्बंध शिथील झाल्यानंतर सर्वच उद्योग व्यवसाय पुन्हा एकदा जोमाने सुरू झाले आहेत. विजय दशमीच्या मुहुर्तावर शहरात चांगली उलाढाल झाल्याचा अंदाज जाणकरांकडून व्यक्त केला जात आहे. आता दिवाळीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. शहरातील विविध भागात आकाश दिवे. पणत्या, महालक्ष्मी मूर्ती, पूजेच्या साहित्याचे स्टॉल सजले आहेत. कापड बाजारात कपडे खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली आहे.
यंदा इको फ्रेंडली आकाशदिवे लक्षवेधी ठरत आहेत. प्लायवूड किंवा लाकडी भुशापासून बनवलेल्या शिटपासून आकाशदिवे साकारण्यात आले आहेत. या दिव्यांची किंमत साडेचारशे ते पाचशे रुपयांपर्यंत आहे. पणत्यांचे दर बीस ते साठ रुपये डझन (१२) असे आहेत. यंदा कोणतीही मोठी दरवाढ झाली नसल्याचे विक्रेते सांगताहेत. ही दिवाळी आनंदाची उधळण करत आली असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत मोठा उत्साह पहायला मिळत आहे.
शहरातील बाजारपेठेत दिवाळीसाठी पणत्या, आकाशदिवे याबरोबरच तोरणा खरेदीलाही पसंती मिळत आहे रूद्राक्ष, कागदी फुले, धातुची घंटी बांधलेले तोरण स्टॉलवर मिळत आहेत. या तोरणांची किंमत दिडशे ते पाचशे रुपयांपर्यंत आहे. त्याबरोबरच शोभेचे आकाशदिवे डझनावर उपलब्ध आहे.