जळगाव । जिमाका वृत्तसेवा
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय, मुंबई अधिनस्त जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, जळगाव येथे महासंचालनालयाचे महासंचालक तथा सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज सकाळी भेट देवून पाहणी केली. जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके (धुळे) यावेळी उपस्थित होते.
महासंचालक डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या कामकाजाची सविस्तर माहिती घेत अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून शासन आणि माध्यमांमधील संवाद वृद्धिंगत होईल. जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माध्यमांमधील नवनवीन प्रयोग, तंत्रज्ञानाची माहिती करून घेत शासनाच्या प्रतिमा निर्मितीसाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहण्याची सूचना केली. जिल्हा माहिती अधिकारी श्री. चिलवंत आणि श्री. बोडके यांनी महासंचालक डॉ. पांढरपट्टे यांचे स्वागत केले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असताना जिल्हा माहिती कार्यालयाचे कामकाज सुरू होते. या कामगिरीची दखल घेत महासंचालक डाॅ. पांढरपट्टे यांनी जिल्हा माहिती कार्यालयातील दूरमुद्रक चालक विनोद पाटील, श्रीमती उषा लोखंडे, संदेश वाहक पंकज ठाकूर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.