बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन तर्फे औरंगाबाद येथे सन्मान
अमळनेर- औरंगाबादच्या बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशनतर्फे रामदास वाघमारे यांनी राज्यातील 34 शिक्षकांना प्रतिष्ठेचा मानला जाणारा राज्यस्तरीय जीवनगौरव वितरण करुन, सन्मान केला असून त्यात अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशिल शिक्षक डी.ए. धनगर यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे जळगांव जिल्हयातून ते एकमेव पुरस्कारार्थी आहेत. या सोहळ्यास परिवारासह त्यांचा सन्मान औरंगाबाद येथील मराठवाडा महसूल प्रबोधिनी सभागृहात महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत बाबा भांड यांच्या हस्ते डी ए धनगर यांचा सपत्निक सत्कार झाला. यावेळी लातूरचे खासदार प्रा. डॉ. सुनील गायकवाड, संस्थापक अध्यक्ष रामदास वाघमारे, मीरा वाघमारे, अधिष्ठाता सरोदे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर पुरस्कारासाठी असलेले निकष हे शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रातील कार्याची नोंद घेवून निवड करण्यात आली आहे. सरांच्या या क्षेत्रातील भरीव कार्यास न्याय मिळाल्याचे गौरवोद्गार परीसरात आहे.
डी. ए. धनगर सरांनी आपल्या वीस-बावीस वर्षाच्या ज्ञानदानाच्या कार्यात स्वतःला झोकून दिलेले आहे. गणितासारखा अवघड विषय ते विद्यार्थ्यांना लीलया समजून देतात. त्यामुळे मोठा विद्यार्थी चाहता वर्ग त्यांचा आहे. त्यांनी आजवर अनेक प्रयोग, उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवले आहेत. त्यामुळे परिसरात उपक्रमशील शिक्षक म्हणून सर्वत्र सन्मान होतो. त्यांचे अनेक उपक्रम गणेशोत्सवात गणिती आरास, गणितात राबवलेला चालता-बोलता उपक्रम, कृतीयुक्त गणित, सेल्फी चा फंडा, पाढे म्हणा व व्हाट्सअप वर टाका, गणिती रांगोळी, त्रिमित सूत्रांकुर, सचिन तेंडुलकर ला पत्र आदी अनेक प्रयोग त्यांनी केलेले आहेत. तसेच आर एम एस ए अंतर्गत आय आय टी पवई मुंबईच्या वतीने झालेल्या प्रशिक्षणात ते राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर आहेत. शैक्षणिक कामासोबतच त्यांचे सामाजिक काम सुद्धा वाखाणण्याजोगे आहे. पर्यावरण समृद्धी साठी वृक्ष लागवड, कोरोना निर्मूलनासाठी केलेले प्रयत्न, कोरोना काळात केलेली जनजागृती, सामाजिक सलोखा राखण्यासाठी केलेले प्रयत्न, तरुणांसाठी स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक, समुपदेशन, हागणदारी मुक्तीसाठी गावखेड्यात केलेले प्रयत्न, कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर येथे संचालक पदावर असताना केलेले काम, प्रशिक्षणात राबवलेली क्यू आर कोड हजेरी असे एक ना अनेक कामे त्यांनी केलेली आहेत.
त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेत बोधी त्री एज्युकेशनल फाऊंडेशन औरंगाबाद यांनी डी ए धनगर यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव, सन्मान केला. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.