पंढरपूर : मुंबई येथील एका भाविकाने विठ्ठल मंदिराला तब्बल 1 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या भाविकांच्या कुटुंबातील सदस्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबाला इन्शुरन्स कंपनीकडून आलेली रक्कम कुटुंबाने विठुरायाला अर्पण केली. विशेष म्हणजे या भाविकांच्या कुटुंबाने आपले नाव गुप्त ठेवण्याची विनंती समितीला केल्याने या दानशुराचे नावं समजू शकले नाही. अलीकडच्या काळात विठुरायाला मिळालेली ही सर्वात मोठी देणगी आहे.
गोरगरिबांचा देव अशी ओळख असलेल्या विठुरायाला एका महिला भाविकाने पतीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी एक कोटी रुपयाचे गुप्तदान दिले आहे.
मंदिराच्या इतिहासात ही मंदिराला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. मुंबई येथील एक तरुण विठ्ठलभक्त कोरोनाच्या संकटात दोन महिन्यापूर्वी जग सोडून गेला. विठ्ठलावर असलेली टोकाची श्रद्धेमुळेच त्याने मृत्यूसमयी आपल्या पत्नी आणि आईला बोलावून निधनानंतर विमा कंपनीकडून येणारी सर्व रक्कम विठुरायाला अर्पण करण्याची अंतिम इच्छा व्यक्त केली. दुर्दैवाने यानंतर काही दिवसात या विठ्ठल भक्ताचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर खरे तर विम्याची येणारी रक्कम विधवा पत्नी आणि लहान मुलींसाठी उपयोगी ठरली असती. मात्र, पतीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी या विधवा पत्नीने विमा कंपनीकडून आलेले 1 कोटीची रक्कम मंदिराला देण्याचा निर्णय घेतला.